# डाॅ. बाआंम विद्यापीठ: पदव्यूत्तर विभागाच्या एप्रिलमध्ये परीक्षा.

औरंगाबाद: दुस-या वर्षीच्या उन्हाळा आला तरी कोरोनाचे संकट काही कमी झालेले नाही. अशा काळात वेळेवर अभ्यासक्रम संपवून एप्रिल अखेरपर्यंत पदव्यूत्तर विभागाच्या परीक्षा यशस्वीपणे पार पाडाव्यात, असे आवाहन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील विभागप्रमुखांची मंगळवारी (दि.दोन) बैठक घेण्यात आली. नवीन शैक्षणिक सत्रातील या पहिल्याच बैठकीत अभ्यासक्रम, तासिका, परीक्षा यासह विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली. महात्मा फुले सभागृहात ‘फिजीकल डिस्टन्सिंग‘ ठेऊन बैठक घेण्यात आली. प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, मार्च २०२० पासूनचे गेले वर्ष सा-या जगावर कोरोनाचे संकट घेऊन आले. शिक्षण क्षेत्रालाही अनेक संमस्याना सामोरे जावे लागले. महाविद्यालये व विद्यापीठात ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने यशस्वीपणे परीक्षा घेतल्या. वेळेत निकाल लाऊन विभाग, महाविद्यालये सुरळीतपणे सुरु होतील, ही अपेक्षा कोरोनाने खोटी ठरविली. या परिस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन तासिका घेऊन अभ्यासक्रम संपवावा लागेल. विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागांना स्वायत्ता असून परीक्षा घेण्याचे अधिकार विभागांना आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा यशस्वीपणे पार पाडाव्यात, असे आवाहनही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. १६ मार्च पासून पदवीच्या परीक्षा होतील. तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येतील, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

प्रास्ताविकात परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील म्हणाले, यंदाच्या परीक्षा या ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने होणार आहेत. ज्यांना ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे. त्यांना त्याचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येणार आहे. तर विद्यापीठाने ज्या महाविद्यालयाचे केंद्र रद्द केले आहे त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयांत व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ज्या त्या अभ्यासक्रमाच्या चालू असलेल्या पॅटर्नच्या गुणांप्रमाणे होणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा ठेवला आहे. दररोज दोन सत्रांत परीक्षा ऑनलाइन परीक्षा देण्या-या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या सत्रात तीन व दुपारच्या सत्रात तीन तास असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ असे सत्र राहणार आहे. हा कालावधी केवळ काही तांत्रिक अडचणी येतील म्हणून देण्यात आला असला तरी फक्त एक तासात पेपर सोडवायचा आहे. ऑफलाइनसाठी सकाळच्या सत्रात एक तास व दुपारच्या सत्रात एक तासाप्रमाणे सकाळी ११ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ४ ही वेळ दिली आहे. दरम्यान परीक्षेसंदर्भातच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाने पाच अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीत उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.प्रताप कलावंत, ए.मु. पाटील, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे आदींचा समावेश आहे. यावेळी विभागप्रमुखांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. अधिष्ठाता डॉ.भालचंद वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सचिन देशमुख यांच्यासह ४८ विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *