# सा.बां.चे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव.

नांदेड उत्तर चे आ.बालाजी कल्याणकर यांची कार्यवाहीची मागणी

नांदेड: महाराष्ट्र विधानसभा नियम २७२ अन्वये अविनाश धोंडगे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांच्याविरुध्द नांदेड (उत्तर) चे आ.बालाजी कल्याणकर यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

यासंदर्भात त्यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, ’’माझ्या नांदेड (उत्त्तर) या मतदार संघामध्ये पूरहानी दुरूस्ती फंड (एफडीआर) मधील ३० कोटीचा पूल नांदेड डिव्हिजन मध्ये असतांनाही भोकर डिव्हिजन मध्ये टाकण्यात आला आहे. तसेच याकामाच्या उद्घाटनाच्या फलकावर ( दिनांक – २२.१.२०२१ रोजी कार्यक्रम) स्थानिक आमदार म्हणून नावांचा उल्लेख नाही.
तसेच दिनांक २६.१.२०२१ रोजी शासकीय विश्रामग़ृह व अधीक्षक अभियंता कार्यालय (विद्युत) उद्घाटनाचा कार्यक्रम माझ्या मतदार संघामध्ये होत असतांनाही या कामांच्या फलकांवरही स्थानिक आमदार म्हणून माझा उल्लेख नाही. तसेच या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवरही नावाचा उल्लेख नाही. एवढेच नव्हेतर, कार्यक्रमाचे निमंत्रण कार्यक्रम सुरू होण्याआधी १० मिनिटे आधी सांगण्यात आले. त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील काही रस्त्यांची सुमारे ३१० कोटीची कामे विशेष रस्ता दुरूस्ती कामांमध्ये प्रस्तावित करण्यास सांगितले असता ही कामे प्रस्तावित करण्यात आली नाही, तर त्याच कामांचा वेगळा प्रस्ताव बजेट प्लेटवर माझे नाव टाकता प्रस्तावित केला. माझ्या मतदार संघातील ३२ कोटींची पूलांची कामे मी मंजूर करून आणली असतांनाही त्यांचे आजपर्यंत अंदाजपत्रक तयार करण्यास अधीक्षक अभियंता हे टाळाटाळ करीत आहेत. तसेच ही कामे बदलण्याचाही त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. तर ६५ कोटीचा उत्तरी वळण रस्ता माझ्या मतदारसंघात असून त्यांचा १९९० च्या प्लानमध्ये समावेश असून मार्च, २०२० च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेला सदरचा रस्ता नकाशे बदलून भोकर मतदार संघात नेण्याच्या हालचालीही सुरू आहेत. याबाबत मी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नात्याने विचारणा केली असता, मला उध्द्टपणाने उत्त्तरे देऊन लोकप्रतिनिधी म्हणून सन्मानजनक वागणूकही देत नाहीत. अविनाश धोंडगे यांचेवर सीआर नं. १५७/२०१३ मध्ये डांबर प्रकरणांमध्ये हे आरोपी आहेत. ज्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, त्याच पोलीस स्टेशन हद्दीत श्री.धोंडगे यांचे कार्यालय येत असून त्यामुळे या संदर्भात होणा-या चौकशीमध्ये श्री.धोंडगे वेळोवळी हस्तक्षेप करत आहेत. चौकशीमध्ये अडथळा होत असल्याने त्यांची बदली होणे आवश्यक असतांनाही त्यांची बदली करण्यात आलेली नाही.

मी, माझ्या मतदार संघात लोकहिताची कामे करीत असतांनाही सदरील कामे आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून डिव्हजन बदलून कामे दुस-या डिव्हीजनमध्ये नेऊन माझ्या मतदार संघातील नागरिकांमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोणत्याही शासकीय कार्यक्रमासाठी संबधित विभागातील अथवा मतदार संघातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिका-यांनी अथवा शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमामध्ये सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचे तसेच त्यांना याबाबतीत निमंत्रित करणे. या संबंधी शासनाने वेळोवेळी विविध परिपत्रके शासन निर्णय तसेच विधानसभा सभागृहात मा. अध्यक्षांनी देखील वेळोवळी शासनाचे तसेच निर्देश अथवा आदेश दिलेले आहेत. असे असतांना वर नमूद केल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विधानपरिषद सदस्यांना निमंत्रण तसेच उद्घाटन फलकांवर नाव टाकण्यात आले आहे व मला स्थानिक लोकप्रतिनिधींनी म्हणून त्या कार्यक्रमापासून वंचित ठेवण्याचा प्रकार त्या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदार संघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून विशेषाधिकाराचा भंग करणारी असल्याचे माझे ठाम मत आहे. याकरिता अविनाश धोंडगे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड त्यांचेविरुध्द विशेषाधिकार हक्कभंगाची सूचना मान्य करुन सदर प्रकरण पुढील चौकशीसाठी विधानसभा हक्कभंग समितीकडे पाठवावे, असेही आ.
बालाजी कल्याणकर यांनी या प्रस्तावात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *