औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून, त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. येळीकर यांना खोकला, ताप आदी लक्षणे दिसून आल्याने त्यांनी घाटी रुग्णालयात स्वॅब दिला होता. शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल झाल्या. तर शनिवारी त्यांच्या घरातील सदस्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
१६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला. ३० जानेवारी रोजी त्यांनी घाटी रुग्णालयात लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर २ मार्च रोजी त्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना खोकला, ताप आदी लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी घाटीत तपासणी करून घेतली होती. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट शुक्रवारी मिळाला.
..म्हणून मी खासगीत दाखल: घाटी रुग्णालयात सर्व बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. सध्या मला ऑक्सिजनची गरज नाही. घाटीतील बेड गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी मी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहे, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.