औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील करणसिंह डोभाल यांच्या देशी दारू दुकानाची जागा ही महापुरूषांच्या स्मारकाजवळ असल्यामुळे शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषद भोकरदन यांनी हे देशी दारूचे दुकान अन्यत्र हलविण्यासाठी दुकानदारास नोटीस दिली होती. तसेच दारूचे दुकान इतरत्र न हलविल्यास हे दारूचे दुकान सिल करण्यात येईल, असा आदेश नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिला होता.
दरम्यान, दुकानदार श्री. डोभाल यांनी ॲड. विक्रम उंदरे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 22 मार्च रोजी भोकरदन नगर परिषदेच्या आदेशास रिट याचिका दाखल करून आव्हान दिले होते. याचिकेच्या प्राथमिक सुनावणी अंती याचिकाकर्त्याचा युक्तीवादानंतर उच्च न्यालालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भोकरदनचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी जालना व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जालना यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याचिकाकर्ते करणसिंह डोभाल यांच्या वतीने ॲड विक्रम उंदरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणी पुढील सुनावणी 14 जून रोजी ठेवण्यात आली असल्याची माहिती ॲड. उंदरे यांनी दिली.