# वेळेपूर्वी मला मरायचे नाही अन् मेल्यावरही जगायचे…

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस हे मराठीतील नामवंत कवी व ललित लेखक होते. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी “ग्रेस” हे नाव धारण केले. ”दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस” या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे त्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृती दिन त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर विकास मेश्राम यांनी टाकलेला प्रकाश…

समीक्षकांनी दुर्बोधतेचा शिक्का ग्रेस यांच्यावर मारला असला तरी त्यांच्या प्रतिमांच्या आशयघन कविता वाचकामध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या. कविवर्य ग्रेस यांच्या प्रातिनिधिक कवितांचे विश्लेषण आणि त्यांना आकळलेले रसग्रहण करून ग्रेसच्या कविता ‘दुर्बोध’ आणि ‘आत्मकेंद्रित’ असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना “मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही” असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी ‘दुर्बोधतेची बेसरबिंदी’ या ललितलेखात म्हटलेले आहे. याच लेखात पुढे त्यांनी “आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही,” असेही म्हटलेले आहे…असे रंग आणि ढगांच्या किनारी, अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे, आठवण, ओळख, ओळखीच्या वार्‍या तुझे घर कुठे सांग?, ऊर्मिलेचा सर्पखेळ’, कंठात दिशांचेहार, कर्णभूल, कर्णधून, क्षितिज जसे दिसते तशी ग्रेस यांची वृत्ती, घर थकलेले संन्यासी, घनकंप मयूराजे सोसत नाही असले डहाळी तुळशीतले, बिल्वदल, ती गेली तेव्हा रिमझिम.., तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तांबे-सोन्याची नांदीतुझी, बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी, तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले देखना कबीर, देवी, दुःख घराला आले,  निनाद, निरोप, या कविता वाचकामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरल्या समीक्षक या कवितांना दुर्बोध म्हणत असले तरी..

नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करात होते.  कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. इ.स. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.

१९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी  “ग्रेस” हे नाव धारण केले. ”दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस” या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, त्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.

ओल्या वेळूची बासरी ललित लेखसंग्रह, कावळे उडाले स्वामी ललित लेखसंग्रह, चंद्रमाधवीचे प्रदेश कवितासंग्रह, चर्चबेल ललित लेखसंग्रह, मितवा ललित लेखसंग्रह, बाई! जोगिया पुरुष कवितासंग्रह, मृगजळाचे बांधकाम ललित लेखसंग्रह, राजपुत्र आणि डार्लिंग कवितासंग्रह, वार्‍याने हलते रान ललित लेखसंग्रह, संध्याकाळच्या कविता कवितासंग्रह, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे ललित लेखसंग्रह, सांजभयाच्या साजणी कवितासंग्रह, सांध्यपर्वातील वैष्णवी, ही त्यांची ग्रंथ संपदा…

इ.स. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.. युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील ‘संदर्भ’ या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते..

गौरववृत्ती (फेलोशिप), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, इ.स. २००५ जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, पुणे, इ.स. २०१०, जीवनव्रती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, इ.स. १९९७, दमाणी पुरस्कार, सोलापूर, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललितबंध) साठी

नागभूषण पुरस्कार, नागभूषण फाऊंडेशन, नागपूर इ.स. २०१०, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’साठी (काव्य), महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चर्चबेल’साठी (ललितबंध), महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘राजपुत्र आणि डार्लिंग (काव्य), महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘संध्याकाळच्या कविता (काव्य), मारवाडी संमेलन पुरस्कार, मुंबई, ‘मितवा’साठी (ललितबंध) वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे, विदर्भ गौरव पुरस्कार, कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर, विदर्भ भूषण पुरस्कार, इ.स. २०११सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर, साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २०११ – वार्‍याने हलते रान या ललितलेखसंग्रहासाठी. या सारखे पुरस्कार त्यांना मिळाले..

कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृती दिन त्यांना विनम्र अभिवादन…

-विकास मेश्राम, गोंदिया
मोबाईल: 7875592800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *