सध्या देश एका मोठ्या संकटात आहे. अशावेळी आपण आपला सामाजिक सलोखा कायम ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी पालघर हत्या यासारख्या प्रश्नांना पेटते ठेवून हितसंबंधाचे राजकारणही कुणी करायला नको. कारण या दुर्दैवी घटनेचे जागतिक परिणाम संभवतात. भविष्यात असे काही घडणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. या निष्पाप साधूंविषयी हळहळ व्यक्त करण्याशिवाय सध्या कोणताच पर्याय आपल्यापुढे नाहीये..!
कालपरवा डहाणू तालुक्यात (जि.पालघर) तिघांची हत्या करण्यात आली. ज्यांची हत्या झाली त्यात दोन साधू होते नि एक त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर. त्यांच्या हत्येचा व्हिडिओ समाज माध्यमातून सध्या व्हायरल होतो आहे. खरंतर हा व्हिडिओ पाहतानाही खूप गलबलून येतंय. डिस्कवरी किंवा ऍनिमल प्लॅनेट या चॅनलवर हिंस्र प्राण्यांच्या झुंडी ज्याप्रकारे सावज हेरून एका बेसावधक्षणी त्याच्यावर तुटून पडतात, तसेच काहीसे हा व्हिडिओ बघताना वाटत होते. जंगली प्राणी सुद्धा शिकारीचे काही तत्त्व पाळतात. म्हणजे भूक असल्याशिवाय किंवा गरजेशिवाय ते विनाकारण निष्पाप प्राण्यांना ठार मारत नाहीत. इथे मात्र जे घडले ते सगळेच अचंबित करणारे आणि थरकाप उडवणारे आहे. हे कृत्य करणारी ‘माणसं’ आहेत की जंगली श्वापदं? असा प्रश्न पडावा इतके हे निर्घृण हत्याकांड घडले आहे. कोणत्या अघोरी भुकेसाठी या माथेफिरूंनी ‘माणसांचा’ बळी घेतला? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे कसे?
ज्यांना ठार मारले ते हिंदू आहेत की अन्य कुणी आहेत, वगैरे मुद्दा बाजूला ठेवून ती ‘माणसं’ आहेत आणि त्यांची हत्या माणसांच्या एका गटाने केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भावनेच्या भरात किंवा सामूहिक उन्मादात थोडी फार मारहाण करणं आपण समजू शकतो, पण ठार मारण्याचेच भूत डोक्यावर घेऊन, स्वतःतले माणूसपण गहाण ठेऊन ज्या निर्दयतेने हे कृत्य केले, ते पाहता आपल्याला आपल्याच माणूसपणाची लाज वाटते. इतके बिनडोक आणि हिंस्र लोक असू शकतात यावर विश्वास बसत नाही. हे सगळं पाहताना अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. मेंदू बधिर होतो. इतकं हे क्रूर आहे. त्या निरपराध वृद्ध साधूच्या चेहऱ्यावरचे केविलवाणे भाव विसरता येत नाहीत. त्यांच्या डोळ्यातली निष्पापता, जगण्याची असोशी कुणालाच कशी दिसली नाही? खरं तर अशा घटना यापूर्वी घडल्या नाहीत असे नाही. अगदी मागच्या काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे असेच पाच गोसाव्यांना जमावाने ठार मारले होते. ‘मुले पळवणारी टोळी’ समजून त्यांचा बळी घेतला गेला. त्याही आधी देशभरात वेगवेगळ्या कारणांनी निष्पापांची अनेक हत्याकांडे घडली. दुर्दैव म्हणजे हे सगळे आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकशाहीवादी देशात घडत आहे, हे अधिक भयंकर आहे. इथे जात, धर्म हा मुद्दा गौण आहे. कारण विकृतीचे मोजमाप या निकषावर करता येत नाही.
सध्या कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजलेला आहे. गेल्या महिनाभरापासून भारतात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. संपूर्ण वाहतूक बंद आहे. जिल्हा बंदीमुळे गावोगावच्या सीमा बंद आहेत. माणसू त्रस्त आहे. अशावेळी एखादी निराधार अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरते आणि त्याची कोणतीही शहानिशा न करता थेट तीन निष्पापांचा जीव घेते. हे अनाकलनीय आणि आत्यंतिक हृदयद्रावक आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओही बनवला गेला. आजच्या काळात सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. तरीही परिणामांची पर्वा न करता माणसं स्वतःतल्या पशूला जागं करण्याचं धाडस कसं काय करू शकतात?
निष्पाप साधूंचा आक्रोश, त्यांचे अश्रू, त्यांच्या वेदना पाहूनही ते विचलित होत नाहीत. आपल्या हातून निरपराधांचे एक भयानक हत्याकांड घडत आहे याची एखादी छोटी जाणीवही या झुंडीत दिसत नाही. किंवा आपण केलेल्या कृत्याचा अपराधभाव कुणाच्याही चेहर्यावर दिसत नाही. उलट आपण एक फार थोर काम केले आहे, असा पुरुषार्थच त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. ही मुलं आणि माणसं आपल्याच समाजाचा एक घटक आहे हे दुर्दैव. क्रौर्याची परिसीमा ओलांडणारी ही खुनशी वृत्ती पाहून आपण हतबल होतो. जे समोर घडतंय त्यावर विश्वास बसत नाही ; पण ते सत्य आहे हेही नाकारता येत नाही.
बरं ही गर्दी पाच-दहा विकृतांची असती तर समजू शकलो असतो, पण शे-दीडशे लोकांचा बिथरलेला जमाव पोलिसांच्या साक्षीने हे अघोरी कृत्य करतोय ही घटनाच मोठी क्लेशदायक आहे. संवेदनेचे स्खलन झालेल्या लोकांकडून करुणेची अपेक्षा बाळगता येत नाही, पण क्रूरतेलाही काही मर्यादा असतात. कायदा, पोलिस वगैरे साऱ्या साऱ्या गोष्टी असतानाही ‘थेट’ निकाल लावण्याची ही वृत्ती कशी समजून घ्यायची? हा खरा प्रश्न आहे. हे विकृत झपाटलेपण या झुंडीच्या मेंदूत घुसतेच कसे? अफवांचे पेव निर्बुद्ध डोक्यात जायला वेळ लागत नाही. सारासार विवेक गमावून बसलेली माणसं असे एखादे कृत्य करण्यात सर्वात पुढे असतात. दुर्दैव हे आहे की पोलिसांच्या हस्तक्षेपालाही जमावाने जुमानले नाही. हे अघोरी धारिष्ट्य माणसात येतेच कसे ? कोणत्या व्यापक हितासाठी ही झुंड एकवटते?
इथेही अशीच अफवा पसरली होती. कोणतीही समंजस चौकशी न करता थेट लाठ्या काठ्याने बेदम मारहाण करणे ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेने आपल्या सामाजिक जगण्यावर तीव्र ओरखडा ओढलेला आहे. परस्परपूरक अशा मानवी भावनांचा संकोच झाला की, असे घडते. अशा घटना या एकूणच मानव जातीसाठी अहितकारक आहेत. मॉब लिंचिंगच्या घटना संशय, अफवा आणि द्वेष भावनेच्या कठोर वृत्तीतून घडत असतील, तर माणूस म्हणून आपण आपली पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. ‘अफवांच्या संसर्गातून हे घडले’ असे म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही मानसिकता नेमकी कशी आकाराला येते? हे मात्र शोधायला हवे. कुठल्याही नेतृत्वाशिवाय अत्यंत निर्वेधपणे अनेक लोक झुंडीचे सदस्य होतात आणि स्वतःचा मेंदू गहाण ठेवून दुसऱ्याचा हकनाक जीव घेतात. ही विकृत जमात कोणत्याही जाती, धर्माची असो त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. ‘जे घडले ते घडले’ असे म्हणून याकडे दुर्लक्ष करायला नको. कारण हे अत्यंत अमानवीय असे कृत्य आहे.
सध्या देश एका मोठ्या संकटात आहे. अशावेळी आपण आपला सामाजिक सलोखा कायम ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी पालघर हत्या अशा प्रश्नांना पेटते ठेवून हितसंबंधाचे राजकारणही कुणी करायला नको. कारण या दुर्दैवी घटनेचे जागतिक परिणाम संभवतात. भविष्यात असे काही घडणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. या निष्पाप साधूंविषयी हळहळ व्यक्त करण्याशिवाय सध्या कोणताच पर्याय आपल्यापुढे नाहीये!
-पी. विठ्ठल, नांदेड
ही माणसांची झुंज नसून हैवानांची झुंड म्हटली पाहिजे. सामुहिक जन्मठेपेची शिक्षा ठोठावली पाहिजे आणि न्यायालयाच्या निर्णयाला व्यापक प्रसिद्धी दिली पाहिजे. जेणेकरून कृत्य करणारांना पश्चातापदग्धता अनुभवाला येईल आणि भविष्यात कोणी अशी झुंडशाही करण्यास धजावणार नाही.