# ई-ऑफिस प्रणाली वापरण्यास सोपी आणि सुलभ असावी.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण

मुंबई: माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-ऑफिस प्रणाली अधिक सोपी, सुटसुटीत आणि वापरण्यास सुलभ करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्यासमोर ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, संचालक माहिती तंत्रज्ञान  रणजित कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.

ज्या विभागात मोठ्या प्रमाणात नस्त्यांची निर्मिती होते त्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ई-ऑफिस प्रणालीचे सर्व विभागांच्या सचिव आणि संबंधित मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात यावे. त्यांच्या सूचनाही घेण्यात याव्यात. ई-ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात येणारा पत्रव्यवहार हाताळताना संबंधितांना त्यासंबंधीच्या सूचना व त्यांनी पाठवलेल्या पत्रावरची कार्यवाही कळवली जावी. ही ई-ऑफिस प्रणाली सुरक्षित आणि परिपूर्ण असावी असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.

विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी 15 शासकीय विभागांच्या 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई -ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *