नांदेड: नायगाव तालुक्यातील कुंटूर चे भूमिपुत्र नांदेड जिल्ह्याचे राजकारणी माजी मंत्री, माजी खा. गंगाधरराव मोहनराव देशमुख कुंटूरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 79 वर्ष होते कुंटूर जिल्हा परिषद सदस्य व नांदेड जिल्ह्याचे 1996 ते 98 मध्ये ते खासदार होते. त्यांनी सरपंचपद ते खासदार, मंत्री अशी विविध पदे भूषविली होती.
गंगाधरराव कुंटूरकर यांनी 1996 ते 98 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून खासदार झाले होते. सरपंचपद ते मंत्री, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य सहकारी बँकेचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. त्यांनी जय अंबिका सहकारी साखर कारखाना काढून परिसरातील अनेकांना रोजगार मिळवून दिला
ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता गमावला –मंत्री अशोकराव चव्हाण
माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली. खासदार, आमदार, राज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. त्यांच्या रूपात ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता आपण गमावला, अशा शब्दांत नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गंगाधरराव कुंटुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे पुत्र राजेश देशमुख कुंटुरकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांचे सांत्वनही केले.