# राहुरीत अपहरण करून पत्रकाराची निर्घृण हत्या.

राहुरी: नगर जिल्ह्यातील राहुरी शहरातून काल दुपारी आपल्या मोटारसायकल वरुन घरी जात असलेले पत्रकार रोहिदास दातीर यांचे अज्ञातांनी  चार चाकी गाडीत टाकून अपहण केले होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह राहुरी कॉलेज रोडला आढळून आल्याने त्यांची हत्या झाली आसल्याचे लक्षात आले आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कायम बहुचर्चित असलेले राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लाॅट, नगर मनमाड रोड वरील एका हाॅटेल इमारत बाबत त्यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून रोखठोक लिखाण करून प्रशासनाला जागे केले होते. काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणातूनच त्यांचे अपहरण झाल्याची चर्चा सुरु होती.

रोहिदास राधूजी दातीर हे त्यांची सफेद रंगाची ॲसेस कंपनीच्या दुचाकिने (एम एच १२ जे एच ४०६३) ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या घरी दातीर वस्ती येथे जात होते. ते सातपीर बाबा दर्गा ते पाटाच्या दरम्यान असतानाच स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मल्हारवाडीच्या दिशेने पळवून नेले. यावेळी त्यांची दुचाकी व पायातील चप्पल घटनास्थळी आढळून आले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. यापूर्वी अनेक वेळा रोहिदास दातीर यांच्यावर हल्ला झाला होता. घटनेनंतर त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान रात्री राहूरी कॉलेज रोड परिसरात रोहिदास दातीर यांचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून हत्या कोणी व कशामुळे याचा शोध राहूरी पोलीस घेत असून मृत दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला होता.

हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून काढा -एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले. रात्री त्यांचा मृतदेह मिळाला या घटनेबद्दल तीव्र संताप आणि चिंता व्यक्त करून एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे की, एका पत्रकाराचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या होते ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील अनेक गैरकृत्य उजेडात आणली होती. लोकांच्या हक्कासाठी लढताना अनेक हितसंबंधी त्यांचे शत्रू झाले होते. दातीर यांच्या लेखणीमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत अशाच विकृत व उपद्रवी लोकांनी त्यांची हत्या घडवून आणली असावी असा अंदाज देशमुख यानी निवेदनात व्यक्त केला आहे. निवेदनाची प्रत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनाही पाठविण्यात आली आहे. निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *