नांदेड: ज्येष्ठ साहित्यिक तु शं कुलकर्णी यांचे आज वृद्धपकाळाने नांदेड येथे निधन झाले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे जन्मलेले तुशं यांनी मराठी साहित्याची शेवटपर्यंत सेवा केली. ते 90 वर्षांचे होते. साहित्य वर्तुळात ते तुशं नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर शासकीय रुग्णालयात त्याचे देहदान करण्यात आले.
मराठवाडा विद्यपीठात ते मराठीचे विभागप्रमुख होते. तत्पूर्वी हैदराबाद संस्थान व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ही त्यांनी आपली सेवा दिली. मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, राज्य ग्रंथालय समिती, साहित्य संस्कृती मंडळ या आणि इतर अनेक साहित्य विषयक समितीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. नवलेखक अनुदान समिती मध्ये तज्ज्ञ परीक्षक, महाराष्ट्र राज्य नाट्य प्रयोगाचे परीक्षक, 1995 पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या मासिकाचे संपादक व मसाप चे कार्यवाह म्हणून 15 वर्ष सतत जबाबदारी सांभाळली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य व कार्यवाह म्हणूनही ते कार्यरत होते. 2002 साली औरंगाबाद येथे झालेल्या 23 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
तृणाची वेदना, ग्रीष्मारेखा, अखेरच्या वळणावर हे कथासंग्रह, कानोसा हा कविता संग्रह, बाबा पृथ्वीसिंह आझाद यांच्या जीवनकार्यावरील क्रांती मार्गावरील प्रवासी, स्वातंत्रोत्तर मराठी कविता या साहित्य कृतीबरोबरच, वाङ्मय कोशासाठी लेखन, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, मराठवाडा इत्यादी नियतकालिकांसाठी सातत्याने समीक्षात्मक लेखन, लियो ह्युबरमन यांच्या मॅन्स वर्ल्डली गुड्स या साहितकृतीचा मराठी अनुवाद, दलाई लामा चे मराठी भाषांतर, मन के जिते जित या महाप्रज्ञ युवाचार्य जैन ग्रंथाचा मराठी अनुवाद ही त्यांनी केला होता.