# महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड-19 समन्वय कक्ष.

आतापर्यंत 450 जणांना लागण, 344 जण कोरोनामुक्त; 9 जणांचा मृत्यू 

पुणे: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील बेड व इतर आरोग्यविषयक मदत तसेच विविध आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी पुणे परिमंडल कार्यालयामध्ये कोविड-19 समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे परिमंडलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मदत करण्यासाठी हा कक्ष काम करीत आहे.

दरम्यान, मागील वर्षापासून आतापर्यंत पुणे परिमंडलातील 374 पुरुष व 76 महिला अशा 450 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 344 जण कोरोनामुक्त झाले असून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या 9 पैकी 7 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 30 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत 97 अधिकारी व कर्मचारी रुग्णालय आणि घरी उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंता व कर्मचारी सुरळीत व अखंडित वीजपुरठ्यासह विविध ग्राहकसेवा देत आहेत. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात देखील गेल्या महिन्याभरापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्तींना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे परिमंडल कार्यालयात कोविड-19 समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  शिरीष काटकर हे कक्षप्रमुख म्हणून काम पाहत आहे. रुग्णालयांशी संपर्क साधून बेड उपलब्ध करून देणे तसेच प्लाझ्मा, औषध व इतर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे.  

महावितरणमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांसाठी कोरोना आजाराचा समावेश असलेला समूह आरोग्यविमा काढण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्य सेवेबाबत काही अडचणी असल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयप्रमुखांनी थेट उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. काटकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे. अत्यावश्यक असलेल्या वीज क्षेत्रात ग्राहकसेवा देताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा क्षेत्रीय काम करताना कोविड-19चा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घ्यावी तसेच कार्यालयांमध्ये कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश प्रभारी मुख्य अभियंता  राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *