दहावीची जूनमध्ये, बारावीची मे अखेर परीक्षा
मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दहावीची जूनमध्ये आणि बारावीची मे अखेर परीक्षा घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत परीक्षा घेणे योग्य होणार नाही. परीक्षेपेक्षा आपले आरोग्य चांगले राहावे, हे आमच्यासाठी मह्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रीज बोर्ड यांनाही आम्ही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती करणार आहोत, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.