नांदेड: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत मराठवाड्यातील एकमेव अशा गुढीपाडवा पहाट-२०२१ च्या कार्यक्रमाचा आनंद आज घरी बसूनच हजारो प्रेक्षकांनी लुटला. विजय जोशी आणि गोविंद पुराणिक यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून तसेच प्रख्यात संगीतकार डॉ.प्रमोद देशपांडे यांच्या संगीत संयोजनातून व उमदा निवेदक रवी नांदेडकर यांच्या उत्कृष्ट निवेदनातून नांदेडच्या कलावंतांनी सादर केलेल्या अप्रतिम रचनामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. फेसबुक लाईव्हवर या कार्यक्रमाचे प्रेक्षपण करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आज पाडवा पहाट या संगीत मेजवाणीने नांदेडकरांना तसेच राज्यभरातील संगीतप्रेमींना थोडासा दिलासाच दिला. विजय जोशी आणि गोविंद पुराणिक यांच्या उत्कृष्ट संकल्पना, दिग्दर्शन व निर्मितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची निर्मिती झाली. मराठवाड्यातील प्रख्यात संगीतकार डॉ.प्रमोद देशपांडे यांच्या संगीत नियोजनातून तसेच उमदा निवेदक रवी नांदेडकर यांच्या बहारदार निवेदनाने या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोविंद पुराणिक यांनी सध्याची परिस्थिती प्रशासना मार्फत कोरोनावर मात करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणि संगीतातील शक्तीचा आविष्कार आपल्या निवेदनातून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात मास्टर विपूल जोशी यांच्या हिच आमुची प्रार्थना या गिताने झाली. कोरोना विषाणूच्या संकटातून हा महाराष्ट्र मुक्त होऊ दे यासाठी ही प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर स्वरुप देशपांडे यांनी येई वो विठ्ठले भक्तजण वत्सले, कधी सांजवेळी मला आठवुनी, डोळ्यावरुन माझ्या उतरुन रात्र गेली आणि गितरामायणातील नकोस नौके परत फिरु-जय गंगे जय भागिरथी ही गिते सादर करुन भक्तीभावाचा वेगळा आनंद देवून गझलच्या माध्यमातून रसिकांना एक वेगळा आयाम दिला. शुभम कांबळे या दमदार गायकाने सखी मंद झाल्या तारका, दिल्या घेतल्या वचनाची आणि सृजन हो घ्या घरी विश्रांती (कोरोना गीत) ही गिते सादर करुन आपल्या अभ्यासपूर्ण गायनाचा रसिकांना परिचय करुन दिला. समीक्षा चंद्रमोरे या कसलेल्या उत्कृष्ट गायिकेने उठी श्रीरामा पहाट झाली, ही वाट दुरु जाते, केव्हा तरी पहाटे आनंद सांगू किती गं, ही गाणी सादर करुन दाद मिळविली. अपूर्वा कुलकर्णी हिने गायिलेल्या भय इथले संपत नाही, जिवलगा कधी रे येशील तू ही दोन बहारदार भावगिते सादर करुन वाहवा मिळविली. पंकज शिरभाते यांची उत्कृष्ट व्हायोलिन साथ, स्वरुप देशपांडे यांची हार्मोनियम, स्वप्नील धुळे यांचा तबला आणि स्वप्नील श्रीमंगले यांचा साईड ्हिदम यामुळे संगीत साथ जबरदस्त झाली. त्यामुळे या कार्यक्रमात खरी रौनक आली. उमदा निवेदक रवी नांदेडकर यांनी आज अभ्यासपूर्ण निवेदनाची प्रचिती देवून नांदेडकरांना तसेच महाराष्ट्रातील रसिकांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली.