मुंबई: आपली मुले जेव्हा इंटरनेट सर्फ करतात तेव्हा पालकांनी सतर्क असावे. एकत्र ऑनलाइन वेळ व्यतीत करा जेणेकरुन मुले तुमच्याकडून योग्य ऑनलाइन वर्तन जाणतील. मुलं वापरतात तो संगणक / टॅब अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे पालकही पाहू शकतात. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर घालवलेल्या वेळेवर लक्ष ठेवा. चाईल्ड लॉक चा वापर करा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मंगळवारी केले.
कोणत्याही अपरिचित अकाउंट शुल्कासाठी क्रेडिट कार्ड / फोन बिलांबद्दल सावधानता बाळगावी. मुलांच्या आवडीच्या साइट बुकमार्क करणं चांगलं. आपल्या मुलांची शाळा, मित्र/मैत्रीणींची घरं किंवा मुलं जेथे आपल्या देखरेखीशिवाय संगणक वापरू शकतील अशा कुठल्याही ठिकाणी ऑनलाइन संरक्षण काय आहे ते शोधा, अशी विनंती गृहमंत्र्यांनी पालकांना केली आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नेमले आहेत, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात महाराष्ट्र सायबर विभाग नोडल अधिकारी आहे.
यूएस-आधारित एनजीओ: नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइज्ड चिल्ड्रन, जे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून बाल पोर्नोग्राफीच्या आयएसपी पत्त्याचा मागोवा ठेवत एनसीआरबीला अलर्ट करतं. त्यानंतर ब्युरो पुढील कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधतं. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सविस्तर समन्वयाने अशा केंद्रित कृतीमुळे चाईल्ड पॉर्नोग्राफीचा नायनाट करु.
याबरोबरच तुमच्या पाल्यांनी इंटरनेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल तुमच्याकडे तक्रार केली तर ती गंभीरपणे घ्या. या संदर्भात स्थानिक पोलिस/महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क करा. तसंच cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही संपर्क करा, असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी केले आहे.