जगातील 180 देशात भारताचे स्थान 142 वे
वॉशिंग्टन: कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नकात, पण वास्तव हे आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा पत्रकारांसाठी धोकादायक देश आहे. हे आम्ही म्हणत नाही तर पत्रकारांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या Reporters Without Border या जागतिक संस्थेच्या अहवालात (world press Freedom index2021) हे वास्तव नमूद केलं गेलं असल्याने भारतातील press Freedom वगैरे बाबी बकवास असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेने जगातील 180 देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या स्थितीची माहिती घेऊन हा अहवाल तयार केला आहे. त्यात पत्रकारितेसाठी जगातील जे “वाईट” देश आहेत त्यात भारताचा समावेश होत असल्याचे संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारत 142 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी देखील भारताचे स्थान 142 वे होते. ते कायम ठेवले म्हणून कोणी पाठ थोपटून घेऊ नये. कारण गतवर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झालेली नसली तरी 2016 मध्ये भारत 133 व्या स्थानावर होता याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नरेंद्र मोदींची देशात हुकूमत सुरू झाल्यानंतर भारत 133 वरून 142 पर्यंत घसरला आहे. चीनची अवस्था आपल्यापेक्षा फारच वाईट आहे. चीन 177 व्या स्थानावर आहे. पण चीनमध्ये माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. शिवाय वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या तिकडे कोणी गप्पा मारत नाही. चीननंतर तुर्कस्थान 178 व्या स्थानावर, उत्तर कोरिया 179 व्या स्थानावर आहे तर इरिट़ेइआ हा देश सर्वात तळाला आहे. ज्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याची बुज राखली जाते त्यात नॉर्वे टॉपवर आहे. त्यानंतर फिनलँड, डेन्मार्कचा नंबर लागतो.
भारतात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करता येत नाही. विविध स्वरूपाचे दबाव आणले जातात. पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांवर खोटे खटले दाखल करून त्यांच्या आवळल्या जाणाऱ्या मुसक्या, नोकऱ्यांवर गंडांतर, अशा घटना भारतात सर्रास घडताना दिसतात. पत्रकारांचे आरोग्य आणि अन्य सोयी -सवलती देण्याबाबत सरकारकडून दाखविली जाणारी उदासिनता ही बाब देखील चिंता वाढविणारी आहे. “जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात असल्याचा ठेंभा आपण कायम मिरवत असतो. मात्र, या लोकशाही प्रधान देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याची कायम गळचेपी होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे मत” मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. “चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी आता देशातील लोकशाही प्रेमी जनतेनं पुढाकार घेतला पाहिजे” असे आवाहनही एस.एम. देशमुख यांनी केलं आहे.