# तुम्हाला तुमची स्टाईल बदलायला हवी.. –डॉ.विजय पांढरीपांडे.

सद्यस्थितीत मला ऑनलाइन म्हणजे आभासी पद्धतीने भाषणे द्यावी लागतात. माझ्या या भाषणाच्या पूर्व तयारीकडे, अन् प्रत्यक्ष भाषणाकडे माझ्या पत्नीचे बारकाईने लक्ष असते. ती सवयीप्रमाणे मला बारीक सारीक पण महत्वपूर्ण सूचना करीत असते. नुकतीच तिने केलेली सूचना मला महत्वाची वाटली, ती म्हणाली-

तुम्ही फार साधं सोपं सरळ बोलता. तसंच लिहिता. आजकाल असं चालत नाही. ऐकणारे ते गांभीर्याने घेत नाहीत. तुम्हाला तुमची स्टाईल बदलायला हवी.

“म्हणजे नेमकं काय करायला हवं?” मला नोंद न झाल्याने मी स्पष्टच विचारले. आमच्यातील देवाणघेवाण ही नेहमीच नको तितकी स्पष्ट, रोखठोक असते.

“हे बघा, परिणामांच्या दृष्टीने भाषण, लेखन, विद्वत्तापूर्ण वाटायला हवं. म्हणजे ते इतकं साधं सोपं सरळ असता कामा नये. तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे ते सहजासहजी समजायला नको. म्हणजे ते बिटिंग अराउंड द बुश असं इंग्रजीत म्हणतात, तसं हवं. ऐकणाऱ्यांना जास्तीत जास्त कन्फूज करा, गोंधळात टाका. डोकं खाजवायला लावा. आपल्याला सगळं काही समजलं, या ऐवजी, हे सगळं किती अवघड आहे, वेगळं आहे, अभूतपूर्व आहे, असं वाटायला हवं. कळतंय का मी काय म्हणते ते?”

मी मान डोलावली. याचा अर्थ मला ती काय म्हणते हे समजलं असा नसून मी स्वतः गोंधळात पडलो असा होता. मी तिला एवढंच म्हटलं, “पुढच्या भाषणाच्या वेळी प्रयत्न करतो, आताच कामाला लागतो!”

ती संधी लवकरच चालून आली. पुढचं भाषण तरुण विद्यार्थ्यांसाठीच होतं. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करायचा, या अभूतपूर्व संकटातून मार्ग कसा काढायचा, याबद्दल मार्गदर्शन करायचं होतं. हे माझ्या अवडीचंच होतं. मी कामाला लागलो. नेहमीसारखे बोलायचे नाही हे ठरवून टाकलं. त्यासाठी आधी मुद्दे लिहून काढले. हे भाषण साधं सोपं सरळ, म्हणजे सहज समजण्यालायक असता कामा नये याची पुरेपूर दक्षता घेतली. ऐकणारे जास्तीत जास्त गोंधळतील हेही पाहिलं. माझं ते अभूतपूर्व भाषण, माझ्या शैलीला छेद देणारं भाषण असं होतं.

सध्या आपण न भूतो न भविष्यती अशा कोरोना ने उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करीत आहोत. हा सामना साधासुधा सामना नाही. ही महाभारताची लढाई नाही. ती वेगळी लढाई आहे. तरी ती आपल्याला एकत्र लढायची आहे. म्हणजे कौरव पांडव या सगळ्यांनी एकत्र येऊन लढायची आहे. एकमेकांशी लढायचं नाही. एक होऊन लढायचं आहे. या लढाईत आपल्याकडे कुणी श्रीकृष्ण नाही. कारण कौरव पांडव एकत्र यायचे म्हटल्यावर श्रीकृष्णाची गरज राहत नाही. जेव्हा एकटा अर्जुन लढतो तेव्हा श्रीकृष्ण लागतो. तुम्ही सगळे तरुण विद्यार्थी आहात. देशाचे भवितव्य आहात. तुम्हाला तुमच्या भविष्याची, करियरची चिंता असणं स्वाभाविक आहे. पण अशी चिंता करणं हेच मुळी अस्वाभाविक आहे. कारण चिंतेने समस्या सुटत नाहीत. उलट वाढते. त्यामुळे तुम्ही अभ्यासाची, परीक्षेची, नोकरीची, कसलीच काळजी करण्याचं काही कारण नाही. हे सगळे प्रश्न आपोआप सुटतील. कारण परीक्षाच होणार नाहीत. परीक्षा हव्याच कशाला? परिक्षेने नेमकं काय साधलं जातं? गुणवत्ता सिद्ध होते? नोकरी मिळते? उलट परीक्षेचे गुण अन् आपली विद्वत्ता यातलं त्रैराशिक व्यस्त असतं. व्यस्त त्रैराशिक ही संकल्पना समजायला कठीण आहे.

आपण कठीण गोष्टीच्या मागे लागता कामा नये. सोपे मार्ग शोधले पाहिजेत. नोकरी परीक्षेच्या निकालावर अवलंबून नसते. करियर, मिळणारा पैसा, मानसन्मान हे काहीच परिक्षेवर, पदवीवर अवलंबून नसतं. मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या पदव्या बघा. त्या कुणाला माहिती आहेत? त्यांची मार्कलिस्ट कुणी पाहिली आहे मतं देतांना? तरी त्यांच्याकडे गाडी, बंगले, पैशाच्या बॅगा असतात. तुमच्या कडे फक्त पदवी असते. आता शशीकपूर दीवार मध्ये म्हणाला तसे म्हणाल, हमारे पास गुणवत्ता है! पण असले डायलॉग कोरोना काळात, किंवा कोरोना पश्चात चालणार नाहीत. आता तर अमिताभ बच्चन चे पिक्चर ही दिसत नाहीत. मग डायलॉग कुठून चालणार? सांगण्याचा मुद्दा हा की तुम्ही करियर ची चिंता करायची नाही. कोरोना मुळे नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत.तुमच्या बुद्धीमत्तेला कुणी विचारणार नाही. कारण कृत्रिम बुद्धीमत्ता आली आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता हा महत्वाचा विषय असला तरी समजायला कठीण आहे. मोबाईल मध्ये आत नेमकं काय चालतं, कसं चालतं, हे आपल्याला कुठे समजतं? तरी आपण तो सहज वापरतोच की नाही? यापुढे आपले सगळे प्रश्न असेच न समजता सुटणार आहेत. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी ती समजलीच पाहिजे असा आग्रह चालणार नाही. प्रश्न न समजता देखील उत्तर देता येतं. मोठमोठी माणसं तेच करतात. त्यांना तज्ज्ञ म्हणतात. त्यांची एक समिती असते. त्याला टास्क फोर्स म्हणतात. ते तासन्तास चर्चा करतात. मोठमोठे अहवाल तयार करतात. पण त्या अहवालाचा कुणाला उपयोग नसतो. कारण ज्यांचा त्यांनाच तो समजला नसतो. अडचणीचे असले तर काही अहवाल चक्क दडपले जातात. नुकतीच टी वी वर सुप्रिम कोर्टाच्या एका प्रख्यात वकिलाची मुलाखत झाली. त्यांनीं कुठच्या तरी व्होरा कमिटीच्या अहवालाचा उल्लेख केला. जो कधीच बाहेर आला नाही. कित्येक वर्षे लोटली तरी बाहेर येणारही नाही. कारण आपलेच दात अन् आपलेच ओठ, अशी म्हण आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे.

आपण देशाचे सुजाण, नागरिक आहोत. तुम्ही डॉक्टर, इंजिनीअर, वकील, आयएएस, वगैरे करियर च्या मागे लागण्याआधी  सभ्य, सुसंस्कृत, देशभक्त, जबाबदार नागरिक व्हायला शिकलं पाहिजे. आता हे शाळा कॉलेजात शिकवले जात नाही, त्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जात नाहीत, हा भाग वेगळा. पण आता एकूणच शिक्षण पद्धती बदलली जाणार आहे. एकजात सगळे सुसंस्कृत, नीतिमान, जबाबदार नागरिक बनतील अशी योजना आहे. ही पंचवार्षिक योजना नाही. ती योजनाच बाद झाली आहे. तरी करियर च्या दृष्टीने हे सगळे महत्वाचे आहे. आपण कायदे, नियम आधी पाळले पाहिजेत. करियरचा विषय दुय्यम आहे. सध्या कोरोना पासून संरक्षण हीच प्रायोरिटी आहे. त्यामुळे घरातच राहा. एकमेकांपासून अंतर ठेवून राहा. तरी चर्चा करा, एकमेकांशी बोला. एकमेकांना मदत करा. गरजूच्या सहायतेसाठी धावून जा. त्यासाठी संचारबंदी, लॉकडाऊन ची पर्वा करू नका. पण सरकारी नियमांचे मात्र पालन करा. सरकारी नेते टीव्ही वर काय सांगतात ते लक्ष देऊन ऐका. ते सगळे समजलेच पाहिजे असा आग्रह धरू नका. बोलणाऱ्यांना देखील समजत नाही, आपण काय बोलतोय, कुणासमोर बोलतोय, ते मग तुम्हाला कसे समजणार? समजणे महत्वाचे नाही. तुमचे वागणे महत्वाचे नाही. कृती महत्वाची. सध्या करियर महत्वाचे नाही. तुमचे प्राण महत्वाचे. जान है तो जहान है, अशी एक म्हण आहे. ही आपल्या राष्ट्र भाषेतील म्हण. तुम्हाला राष्ट्रभाषा यायलाच हवी. मातृभाषा देखील यायला हवी. आता तर सगळ्या शिक्षणाचा भर मातृभाषेवर असणार आहे. इंजिनीअर, मेडिकल, कोर्ट, कचेऱ्या, मल्टी नॅशनल कंपन्या, सगळे व्यवहार मातृभाषेत होतील. किती छान अनुभव आहे हा! विविधतेत एकता वगैरे म्हणतात ते हेच. त्यामुळे शिक्षणाची, नोकऱ्यांची चिंताच नको. तुम्ही देशात कुठेही जाऊ शकता नोकरीसाठी. सध्या लॉकडाऊन चे निर्बंध आहेत. पण ते नेहमीच राहणार नाहीत. कोणतीच गोष्ट शाश्वत नसते. कोरोना देखील अमर नाही. हेच शाश्वत सत्य आहे. वर्षानुवर्षे आपल्या संस्कृतीने, इतिहासाने आपल्याला ते शिकवले. पण आपल्याला आपले जुने ग्रंथ वाचायचे नाहीत. मागे वळून बघायचे नाही. एक लक्षात ठेवा. पुढचा अंक हा मागील अंकावरून पुढे चालू असतो. पण लोकांना सगळे नाटक वाटते. हे नाटक नाही. आपण वास्तवाचा सामना करायला शिकले पाहिजे.

कोरोना, लोकडाऊन, आर्थिक मंदी, प्राणवायूची कमतरता, अपुरी आरोग्य सेवा हे खरे वास्तव. परीक्षा, करियर हे सगळे यापुढे दुय्यम. ती काळजी तुम्ही करू नका. तुमचे पालक पाहून घेतील. ते काहीतरी जुगाड करतील. शिवाय सरकार आहेच. शेवटी सरकार कशासाठी आहे? कुणासाठी आहे? तुमच्या आमच्या साठीच ना? आपणच त्यांना निवडून देतो. आता आपली निवड चुकली तर त्याचं खापर सरकारवर का फोडायचे? परीक्षेत तुम्ही चूक उत्तर लिहिले तर कमी मार्क मिळणारच ना? एकदा पेपर सबमिट केला की उत्तर बदलता येत नाही. तसंच सरकारचे! आपणच त्यांना निवडून द्यायचे अन मग आपणच दोष द्यायचे हे काही खरं नाही. तार्किक तर अजिबात नाही. निर्णय प्रक्रियेत तर्काला नेहमी महत्त्व असतं. आपलं बोलणं, वागणं, तर्कशुद्ध असायला हवं, असं मोठे लोक म्हणतात. वडील मंडळी सांगतात त्यावर विश्वास ठेवायचा असतो. ते पटो वा न पटो, खरं मानायचं असतं. मोठी माणसं नेहमी तर्कशुद्ध विचार करतात हे गृहीत धरायच असतं.

थोडक्यात काय तर या आपत्कालीन स्थितीत आपण एकत्र काम करू. समस्या एकत्र बसून सोडवू. पण त्यासाठी घराबाहेर पडायची गरज नाही. सोशल दुरी पाळायलाच हवी. प्रत्येकाच्याच पोटा पाण्याचा प्रश्न आहे. केवळ तुमच्या करियर चा प्रश्न नाही. व्यापारी, कामगार, मजूर, फेरीवाले, छोटेमोठे कलावंत, शेतकरी, सगळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापली कामे करावी. घरी बसून करावी. नियम पाळून, घराबाहेर जाऊन मदत करावी. कायद्याचे उल्लंघन केले तर शिक्षा होते, दंड होतो. नुकसान कुणाचे होते? तुमचेच. सरकारचे कधीच नुकसान होत नाही. सरकार कधी चुकत नाही. सरकारचे दिवाळे निघाले, असे तुम्ही कधी ऐकले का? दिवाळे व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे निघते. तेव्हा शहण्यासारखे तुम्हीच वागायला हवे. ती तुमची जबाबदारी आहे. सरकारची नाही. ते तुमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. सरकारला राष्ट्रीय कर्तव्य नसते, नागरिकांना असते. प्रत्येकांनी आपापले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे. कर्म करीत राहावे. फळाची आशा धरू नये. असे आपल्या गीतेने सांगितले आहे. गीता म्हणजे भगवद्गीता, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी भरपूर वाचन हवे. करोना ही त्यासाठी सुवर्णसंधी आहे, इष्टापत्ती म्हणा हवं तर. परीक्षा, करियर, नोकरी हे नेहमीचेच आहे. त्यात नाविन्य काजीच नाही. तुमच्या पिढीने नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे. आज काय गरजेचे आहे त्याचा आधी विचार करा. ते जास्त महत्वाचे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने.

एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो. (हे चार शब्द नव्हते याची मला जाणीव आहे. पण तसा समारोप करायचा संकेत आहे. मोठमोठे विद्वान, पुढारी, मंत्री, तासभर बडबडतात. पण चार शब्द बोलून थांबतो असेच म्हणतात. ही परंपरा आहे. परंपरा पाळायची असते.)”

माझे हे भाषण संपताच पत्नीने माझी पाठ थोपटली. मला पहिल्यांदा शाबासकी दिली. हे असे क्वचितच घडते हे सांगणे न लागे!

–डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *