# संरक्षण क्षेत्रातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांची मानसिकता -प्रा.डॉ. वृषाली राऊत

देशाबाहेरील व देशातील शत्रूंशी यशस्वी लढा देणारे संरक्षण क्षेत्रातील अनेक कर्मचारी स्वत:च्या आयुष्याची लढाई हरतात हे गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होणार्‍या आत्महत्या मधून दिसून येते. दरवर्षी साधारण १०० भारतीय सैन्य दलातील लोक आत्महत्या करतात ज्यात हवाई दल, सैन्य दल, नौदल व राखीव सुरक्षा दल यातील लोक येतात. मात्र, भारतातील सर्व राज्यातील पोलीसांच्या आत्महत्या येत नाहीत. काश्मीर सारख्या सतत संघर्ष असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या संरक्षण क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे…

American Sniper या २०१४ च्या अमेरिकन सिनेमात एका अशा एका सैनिकाची खरी गोष्ट आहे जो त्याच्या देशाकडून लढताना शत्रुकडच्या १६० लोकांना मारतो ज्यात स्त्रिया व मुलांचा पण समावेश आहे. मात्र, त्या देशासाठी युध्द भूमीवरचा “हिरो” असलेला त्याच खरं आयुष्य जगताना अशा मानसिक अवस्थेतून जात असतो ज्यात तो साधारण आयुष्यात जुळवून घेऊ शकत नाही. युद्धभूमीवरच्या भयानक आठवणी त्याला नीट झोपू देत नाही, त्याला त्याच गोष्टी परत परत आठवतात व परत पूर्वीसारखं साधारण आयुष्य जगू शकत नाही. त्याचा अंत दुर्दैवी पद्धतीने होतो. या सिनेमाने संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कशा पद्धतीचे मानसिक त्रास होऊ शकतात हे अत्यंत परिणामकारक पद्धतीने दाखविले होते. संरक्षण क्षेत्रात काम करणारी लोक ही शारीरिक व मानसिक दृष्ट्‍या अत्यंत कणखर समजली जातात. मात्र, त्यांच्या कामाचं स्वरूप हे अत्यंत धोकादायक असल्याने त्यांना होणारे मानसिक आजार हे सुद्धा अतिशय तीव्र असतात.

आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके अस नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्‍या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्र सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.

या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात ताण, चिंता, भावनिक गुंता, औदासीन्य, आत्महत्येची प्रवृत्ती व PTSD येतात

प्रत्येक देशाला अंतर्गत व बाह्य अशा दोन ठिकाणी सुरक्षा ठेवावी लागते. देशाला बाहेरून होणार्‍या हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी जी संरक्षण व्यवस्था असते ती जास्त अद्ययावत असणे अपेक्षित आहे व त्यात काम करणारी लोक ही वेगवेगळ्या पातळीवर काम करतात. अंतर्गत सुरक्षेसाठी काम करणारी लोक त्यामानाने वेगळ्या आव्हानांना सामोरे जातात. मात्र, त्यांनाही जीवावर उदार होऊनच या सर्व जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात.

देशाबाहेरील व देशातील शत्रूंशी यशस्वी लढा देणारे संरक्षण क्षेत्रातील अनेक कर्मचारी स्वत:च्या आयुष्याची लढाई हरतात हे गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होणार्‍या आत्महत्या मधून दिसून येते. दरवर्षी साधारण १०० भारतीय सैन्य दलातील लोक आत्महत्या करतात ज्यात हवाई दल, सैन्य दल, नौदल व राखीव सुरक्षा दल यातील लोक येतात. मात्र, भारतातील सर्व राज्यातील पोलीसांच्या आत्महत्या येत नाहीत. काश्मीर सारख्या सतत संघर्ष असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या संरक्षण क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. Institute for Defense Studies and Analyses (IDSA) यांच्या एका संशोधनानुसार काश्मिरात तैनात असणार्‍या सैनिकांना स्वत:च्या लोकांविरूद्ध लढताना “लढणारे” व “न लढणारे” अशा लोकांच्या मध्ये फरक करणे अवघड जाते व या द्विधा मन:स्थितीतून मानसिक ताण व वेगवेगळ्या भावनिक आंदोलन तयार होऊन स्थिर चित्त राहणं कठीण जात.

United Service Institution of India (USI) याचं संशोधन हेच सांगत कि बंडखोरांना निपटून काढण्यासाठी शासनाने केलेली कारवाई (Counter Insurgency) व दहशतवाद विरोधी वातावरण (Counter Terrorism environment) या दोन गोष्टींशी लढताना अनेक अंतर्गत कारणे जसे कुशल नेतृत्वाचा अभाव, अपुरी संसाधन, पदोन्नती मध्ये पारदर्शकता नसणे, वेतन व दर्जा कमी करणे, प्रेरणा नसणे, रजा न देणे, नागरी अधिकारी लोकांची उदासीन वृत्ती लढणाऱ्या लोकांचं मनोबल कमी करतात.

मानसशास्त्रज्ञ नॉर्मन डिक्सन यांच्या On the Psychology of Military Incompetence या पुस्तकात सैन्य दल हे पुरूषत्व सिद्ध करण्याचे ठिकाण असल्याने अति-प्रमाणात दारू पिणे व उघडपणे लैंगिक संबंध हे राजरोसपणे चालतं. अमेरिकेतली सैन्य दलातील अधिकारी स्वत:च्या अति तीव्र टेस्टोस्टेरॉन मुळे सतत आम्हाला आमची लैंगिक भूक भागवण्यासाठी स्त्रिया हव्या असतात असं सांगतात व स्त्रियांकडून लैंगिक सुख मिळविणे हे सुद्धा त्यांना एक विजय मिळविल्यासारखं असत.

सैनिकी इतिहासकार जॉन लॅफिन यांच्या मते अमेरिकन सैन्य दलातील अधिकारी हे त्यांच्या कामापेक्षा स्त्री व लैंगिक सुख यातच इतके गुंतलेले असतात की सकाळ, संध्याकाळ व रात्री फक्त हे एकच सुख हवं असत ज्याला त्यांच्या सैनिकांनी सुद्धा विरोध दर्शविला. असले प्रकार भारतीय सैन्य दलात सुद्धा अस्तित्वात आहेत फक्त ते मान्य केले जात नाहीत. गूगल चा डेटा बघितला तर असे भारतीय सैन्यातील ज्येष्ठ पदावर काम करणाऱ्या लोकांनी सत्तेचा चुकीचा वापर करून कसे लैंगिक छळाचे प्रकार केले आहेत हे सुद्धा कळतं. या लोकांच्या हातात पुरेपूर सत्ता असते ज्याचा ते दुसर्‍याचं शोषण करण्यासाठी उपयोग करतात.

भारतीय सैन्यात होणारे लैंगिक छळाचे प्रकार व भारतीय सैन्याकडून होणारे बलात्कार हे सुद्धा सैनिकांचा मानसिक कोलाहल दाखवतात. मात्र, तुरळक अपवाद सोडता कोणताही भारतीय मीडिया ह्या गोष्टी भारतीयांसमोर आणत नाहीत.

एका RTI च्या माहितीनुसार गेल्या २०१४-२०१९ या काळात महाराष्ट्र राज्याने १३७ पोलीस कर्मचारी आत्महत्येमुळे गमावले आहेत ज्यात ५ स्त्री कर्मचारी व एक उच्च अधिकार्‍याच्या समावेश आहे. तसेच २०१४ मध्ये सर्वात जास्त ३६ पोलीस कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८ मध्ये महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांनी आजारपणामुळे व कानपूर येथे सुरेंद्र कुमार दास यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली. संपूर्ण भारतात २०१४-२०१८ च्या काळात भारतातील ९४० पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १६ तास काम व अत्यंत कमी सुट्ट्या यामुळे स्वत:ला व कुटुंबाला वेळ न देऊ शकणे त्यातून निर्माण होणारे आरोग्याच्या समस्या व घरगुती कलह, कामाची अत्यंत चुकीची पद्धत ज्यात वर्षानुवर्षे काहीही बदल न होणे यामुळे पोलीसांवरील ताण सतत वाढत असून त्यामुळे औदासीन्य, चिंता व इतर भावनिक गुंता वाढत जाऊन पोलीस कर्मचारी हे टोकाचे निर्णय घेतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात जास्त काम करावं लागत, कारण वर्षानुवर्षे कर्मचारी भरती होत नाही व कामाची पद्धत जुनीच असते.

महाराष्ट्रात कोविड च्या काळात ३४९ पोलीसांनी प्राण गमावले

संशोधन सांगतं की प्रदूषित हवेमुळे प्रौढ व्यक्तींच्या बौद्धिक क्षमता कमी होतात व औदासीन्य येऊ शकतं. तसेच आवाजाच्या प्रदूषणामुळे रक्तातील कॉर्टिसॉल या ताणा संबंधित संप्रेरकाची पातळी वाढून चिंता, औदासीन्य हे मानसिक विकार बळावतात व रक्तदाब वाढतो. भारतातील वायू व आवाजच प्रदूषण आपल्या ट्रॅफिक पोलीसांना काय त्रास देत असेल याची कल्पना आपण करू शकतो.

सैन्यदल व पोलीस यांच्यात व्यसनाचे प्रमाण सुद्धा खूप आहे. भारतीय सेनेत निवड होताना विशेष करून अधिकार्‍यांना अत्यंत कठोर अशा मानसिक व शारीरिक चाचणीतून जावं लागतं व भारतीय सैन्याची मानसिक चाचणी अत्यंत वैज्ञानिक असते. मात्र, अशी उत्तम मानसिक व शारीरिक पातळी असलेली व्यक्ती आत्महत्या करायला कशी तयार होते याचं उत्तर ज्या पद्धतीने ती व्यक्ती काम करते त्यात दडलं आहे. २००७ पासून ए. के. अँटनी संरक्षण मंत्री असताना भारतीय सैन्याने अनेक चांगले व प्रशंसनीय मानसिक आरोग्याचे उपक्रम राबवले असूनही अशा घटनांत वाढ होतच आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे कामाची संस्कृती असून त्यातील अनेक चुकीच्या प्रथा बंद केल्या आहेत तर नक्कीच बदल जाणवेल. ह्याच प्रकारे पोलीसांची कार्य संस्कृती तत्काळ बदलून त्यांच्यावरील कामाचा भार कमी केल्यास पोलीस दलावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

युद्ध व चकमकी च्या वेळी घेण्यात आलेले निर्णय व त्यातून झालेली जीवित, वित्त हानी सुद्धा सैनिकांना अपराधीपणा चा भाव जागृत करते. जीवाला मारणं अजिबातच सोपं नाही त्यामुळे आपण एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो आहोत ही भावना सैनिकांना सतावते.

सतत ची हिंसा व हिंसेचे सान्निध्य ही आक्रमता वाढवते. मानवी मेंदू हा करूणा, सहसंवेदना यासाठी प्रोग्राम आहे ज्यामुळे दुसर्‍याला वेदना दिल्यास आपण त्या दिलेल्या वेदनेची जाणीव खूप त्रास देते. मात्र, या सगळ्या गोष्टी एका सैनिकाच्या मेंदूत जो कर्तव्य म्हणून लोकांना मारतो व एका माथेफिरू खुन्याच्या मेंदूत वेगवेगळ्या पद्धतीने सक्रिय असतात.

Social Cognitive and Affective Neuroscience या जर्नल यामध्ये छापून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील मोनाश विद्यापीठाचे पास्कल मोलेनबर्ग यांच्या एका संशोधनात असं आढळून आलं की orbitofrontal cortex जे नैतिक संवेदनशीलता, नैतिक निर्णय आणि कसे वर्तन करावे याबद्दल निवडी करणे या मेंदूच्या भागात जास्त हालचाल आढळली ज्या वेळेस गरज किंवा कारण नसताना एखादी व्यक्ती मारल्या गेली याउलट शत्रुपक्षातील सैनिकाला मारताना या भागातील हालचाली अत्यंत कमी आढळून आल्या. यावरून काश्मीर सारख्या भागात काम करणारे भारतीय सैनिक काय मानसिक द्वंद्व अनुभवत असतील याची कल्पना येते.

सोबतच्या सहकाऱ्याच्या मृत्यू, शारीरिक दुखापती, शस्त्रां सोबत राहणे, दुर्गम भागात एकटेपणा सोसणं, प्राणवायू कमी असलेल्या प्रदेशात काम करणे, कठीण नैसर्गिक आपत्तिचा सामना करत दुसर्‍याचं संरक्षण करणे, त्यासाठी स्वत:चा जीव देणे हे सोसत भारतीय सैनिक व त्यांचे कुटुंबिय सुद्धा मानसिक त्रासाचा सामना करतात.

सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन रघु रामन यांच्या मते आपल्या सैन्य दलाच्या “अति-पुरुषी” चेहरा बदलविण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने लढणे ज्यातून पुढे जाऊन मानसिक त्रास उद्भवतात हे पुरुषी धैर्य म्हणून मिरवायचे नसून मूर्खपणाचे लक्षण आहे हे सैनिकांना व समाजाला सुद्धा समजले पाहिजे.

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, कोलंबिया युनिव्हर्सिटी, अमेरिकन सैन्य आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सनी) डाउनस्टेट मेडिकल सेंटर यांनी व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेल्या १३७७ सैनिकांवर १९८४ साली अभ्यास केल्यावर असं आढळून आलं की यातील बहुतेक सैनिकांना PTSD म्हणजे post-traumatic stress disorder चा त्रास अजूनही जाणवतो ज्याने त्यांच्या वैवाहिक जीवनावर, पालकत्वाच्या शैलीवर, मानसिक व शारीरिक आरोग्यावर न पुसले जाणारे परिणाम केले आहेत.

Avengers या Marvel Comics च्या सिनेमात काही सुपरहिरो जे जगाला दुष्ट शक्तीपासून जगाला वाचविण्याचे काम करतात ते सुद्धा त्यांच्या कामात निष्पाप जीवांचा बळी जातो हे शल्य बाळगताना अचूकपणे दाखवले आहे. मात्र, आपल्याकडे जे सैन्य दल व पोलीस यांच्या वर ज्या कथा व सिनेमे असतात त्या त्यांना “देव” म्हणूनच दाखवतात व त्यांच्यातील माणूस जो कधी चुका करतो, खाली झुकतो, कमी पडतो व अगदी भ्रष्टाचार करतो ते का करतो याची मानसिक कारण योग्य वैज्ञानिक पद्धतीने दाखवत नाही.

अनेक पोलीस व सैन्य दलातील लोकांना चुकीच्या किंवा मुद्दाम सूड घेण्यासाठी कामावर तडकाफडकी निलंबित केलं जात व अनेक वेळा त्यांची दुर्गम ठिकाणी बदली होते यामुळे त्यांच्या घरच्या लोकांना त्रास होतो. सैन्य दलात गुप्त हेराच काम करणारे लोकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सुद्धा जास्त क्लिष्ट असतात कारण त्यांच्या कामाचे स्वरूप हे जास्त धोकादायक असते.

संरक्षण दल (सैन्य व पोलीस) हे प्रामुख्याने व परंपरेने पुरुषी क्षेत्र आहे व रक्षण करणारा हा नेहमीच देव किंवा हिरो असतो जो थकत नाही, रडत नाही व नेहमीच देशासाठी लढताना प्राणाची बाजी लावतो व अनेक वेळा प्राण गमावतो. आपण सामान्य लोक नेहमीच या लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो पण आपण हे सोयिस्कररित्या विसरतो की ही पण माणसेच आहेत ज्यांना स्वत:चे आयुष्य आहे. ते आपले २४*७ गुलाम नाहीत. सरकारी व्यवस्था सुद्धा या लोकांना वापरून घेते व त्याला देशप्रेमाच लेबल लावून त्यांच्याकडून भरपूर काम करून घेते. मात्र, इतर सोयी सुविधा प्रामुख्याने मानसिक आरोग्याचा विचार अजिबात करत नाही. भारतीय सैन्य काही प्रमाणात सैनिकांसाठी मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देतं. मात्र, राज्य सरकार पोलीसांच्या मानसिक आरोग्याचा विचारच करत नाही. संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुष  (व स्त्रिया सुद्धा) यांनी दुसर्‍याच रक्षण करताना स्वत:च्या आरोग्याचं रक्षण करायला हवे व मानसिक आरोग्यासाठी मदत मागायला लाज वाटू देऊ नये.

लढताना शरीराचे रक्षण करायला जे चिलखत देतात त्या सोबतच आपल्या सैनिकांना व पोलीसांना मानसिक आरोग्याचे कवच सुद्धा देणे गरजेचे आहे.

“The true soldier fights not because he hates what is in front of him, but because he loves what is behind him.”― G.K. Chesterton.

-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *