पुणे: कोरोना महामारीच्या दुस-या लाटेत विषाणूची लागण, त्यानंतरचे स्वरूप आणि एकूण परिणाम यमध्ये फार गुंतागुंत होत असल्याने अनेक जीव जात आहेत. मात्र, अशी काही उदाहरणे आहेत की वेळीच योग्य मदत मिळाल्याने अनेकजण सुदैवी ठरत आहेत. अशीच एक गरोदर माता आणि तिचे कुटुंबीय सुदैवी ठरले. विशेष म्हणजे वेळ टळताच मदत करणा-या प्रत्येकाचे त्या कुटुंबाने मनस्वी आभार मानले.
बारामती ग्रामीण मध्ये राहणारी 31 वर्षीय विद्या दरडे आठ महिन्याची गरोदर, आता अशा स्थितीमध्ये डॉक्टरची काही मदत लागली तर काय करावे, अशी भीती मनात असतानाच अचानक 21 एप्रिलला सगळ्या कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला, विद्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, आता हे नक्की कोरोनाच आहे अशी शंका येऊन कुटुंब अक्षरशः हवालदिल झाले. कुटुंबाच्या जवळ असलेल्या आणि विद्याची मैत्रीण असलेल्या डेन्टीस्ट डॉ. मृणाल दिघे यांना संपर्क केल्यावर त्यांनी कोविड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लगेच अँटिजन रॅपिड टेस्ट केली. मात्र, ती निगेटीव आली, सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला पण श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुन्हा RT-PCR करण्याचा सल्ला दिला, पण त्या टेस्टचा रिपोर्ट चार चार दिवस येत नसल्याने काय करावे सुचेना, इंदापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. प्रथम उपचार तिथे करुनही स्थिती आवाक्यात नसल्याने बारामतीच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले. तिथे तपासणी झाल्यावर ऑक्सीजनची मदत लागत असल्याचे स्पष्ट झाले आणि कुटुंब सैरभैर झाले. नेमके काय समजावे कळेना, अखेर स्त्री रोग तज्ज्ञांनी विद्याला आणि बाळाला वाचवायचे असेल तर पुण्याला जाण्याचा सल्ला दिला.
पुण्यात रुग्णालयातली भयंकर स्थिती ऐकूण-वाचून माहिती होती. त्यामुळे बेड आणि तो ही ऑक्सीजन बेड मिळेल का हा मोठा प्रश्न होता. पुन्हा डॉ. मृणालला फोन केला, त्यांनी पुण्यातले सेल्स टॅक्सचे उपायुक्त गिरिष कट्टी यांना मदत मागितली, दीड दिवस अशीच स्थिती सुरु होती, अगदी अम्बुलन्सही मिळत नव्हती, ती मिळाली तर आहे त्या दवाखान्यातून घेऊन जायचे तर तिकडे बेड तरी मिळाले पाहिजे, बेड मिळाले तर बारामती ते पुणे हे अंतर पार करेपर्यंत बेड रिझर्व राहिले पाहिजे होते. कारण एवढ्या लोकांना गरज आहे, यापासून ते अनेक अडचण येत होत्या. विद्याची स्थिती तर गंभीर होत होती. अधिकारी कट्टी आणि डॉ मृणाल दिघे यांची याबाबतच चर्चा सुरु असताना दुस-या एका रुग्णाच्या मदतीसाठी पत्रकार रफ़ीक मुल्ला यांचा कट्टींना फोन आला आणि त्यांनी विद्याची हकीकत मुल्ला यांना सांगितली. वेळीच मदत मिळाली नाही तर माता आणि बाळ वाचणारच नाही हे ओळखून रफ़ीक मुल्ला यांनी इतरत्र फोन करुन वेळ घालवण्यापेक्षा थेट सुप्रियाताई सुळे यांना फोन केला. माहिती घेऊन तातडीने ताईंनी पालिका आयुक्तांना बेड करण्याच्या सूचना दिल्या. अक्षरशः दोन मिनिटात भारतीसह दोन रुग्णालयात ऑक्सीजन बेड मिळाला, ताईंचे पीए मयूर जगताप, वरिष्ठ पत्रकार गिरिष अवघडे यांनी पुढच्या काही मिनिटात लगेच तिथे प्रत्यक्ष जाऊ निश्चिती केली. बारामतीहून रात्री उशिरा विद्याला घेऊन अम्बुलन्सही भारती रुग्णालयात पोहोचली, त्याठिकाणीही कोविड टेस्ट केली. मात्र, पुन्हा ती निगेटिव आली. पण घसरत असलेली ऑक्सीजन पातळी आणि श्वास घेण्यास होत असलेला त्रास..सगळी गुंंतागुंत असल्याने स्त्रीरोग तज्ज्ञासह विविध तज्ज्ञ डॉक्टर समूह लागणार होता, भारती रुग्णालयाचे प्रमुख आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनाही रफ़ीक मुल्ला यांनी माहिती दिली, त्यांनी स्वत: विद्याच्या स्थितीची माहिती घेतली आणि प्रकृती स्थिर होईल असे उपचार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ससून मध्ये अशा गरोदर महिलांवर यशस्वी उपचार करणारी टीम असल्यामुळे सुप्रियाताई आणि विश्वजीत कदम यांच्या सुचनेने विद्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे बेड आणि त्या डॉक्टर समूहाचे उपचार मिळण्याची पुन्हा खात्री केली ती सुप्रियाताई आणि त्यांच्या कार्यालयाने. ससूनमध्ये स्पष्ट झाले की विद्याला निमोनीया झाला आहे आणि तो कोविड निमोनीयाच आहे. त्यानंतर चांगले उपचार करुन आता विद्या संकटातून बाहेर पडली आहे, ऑक्सीजन लेवल 80 वरुन 95 पर्यंत सुधारली आहे. आता ऑक्सीजनची गरज लागत नाही. पुढच्या काही दिवसात विद्याची प्रसूतीही व्यवस्थित होईल याची डॉक्टर्सनी खात्री केली आहे, तसे उपचार आणि लक्ष दिले जात आहे.
बाहेर असलेल्या भयंकर स्थितीमध्ये विद्याला वेळीच उपचार मिळू शकले. यासाठी अनेकांची मदत झाली. विद्याने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्या सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.