पुणे: कोरोनाचा सध्या पुणे, मुंबईसह राज्यभरात कहर वाढला आहे. रूग्ण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत की, वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. यावर सरकार उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी विविध घटक पुढे येत आहेत. त्यातच पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक कार्यालयातील अतिरिक्त संचालक आनंद रायते (आयएएस) यांनी मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून एक लाख रूपये भूमी अभिलेख कर्मचारी कल्याण निधीसाठी दिले आहेत.
पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक कार्यालयातील अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी या निधीचा वापर होणार आहे. त्यामुळे आनंद रायते यांनी मदतीचा हात पुढे करत मुलीच्या लग्नातील खर्चाला फाटा देऊन एक लाख रूपयांचा धनादेश जमाबंदी आयुक्त आणि संचालक एन. के. सुधांशू यांच्या सुपूर्त केला. त्यांचा हा आदर्श घेऊन भूमी अभिलेख विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही कर्मचारी कल्याण निधीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. याबरोबरच अनेकांनी प्रत्यक्ष मदतनिधीसाठी मदत देण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी कर्मचारी कल्याण निधीसाठी एक लाख रूपयांचा निधी दिल्याबद्दल कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस आर. एम. कांबळे यांनी श्री. रायते यांचे एका विशेष पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसह कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.