मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत रेड अलर्ट
पुणे: ‘तोक्ते’ चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ताशी 155 ते 185 किलोमीटर वेगाने गुजरातच्या किनारपट्टीकडे कूच करीत आहे. हे चक्रीवादळ पोरंबदर, मधुवा ही गुजरातच्या किनारपट्टीवरील शहरे पार करून 18 मे रोजी सौराष्ट्र, कच्छ्, दिऊ आणि आसपासच्या भागात पोहचणार आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम लोणावळ्यापासून ते गुजरातच्या सीमावर्ती भागापर्यंत पसरलेला आहे.
गुजरातच्या किनारपट्टीवरून 20 मे रोजी दक्षिण राजस्थानकडे; 20 मे नंतर वादळ थांबणार
हे चक्रीवादळ पोरंबदर, मधुवा ही गुजरातच्या किनारपट्टीवरील शहरे पार करून 18 मे रोजी सौराष्ट्र, कच्छ्, दिऊ आणि आसपासच्या भागात पोहचणार आहे. ‘तोक्ते’ अतितीव्र चक्रीवादळ 20 मे च्या सुमारास दक्षिण राजस्थानला पोहचणार आहे. त्यानंतर या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू कमी होईल. दरम्यान, कोकणच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता या भागातील पाऊस कमी झाला आहे.
‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर या भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली होती. घाटमाथ्यावर देखील पावसाचे जोरदार हजेरी लावली होती. आता पावसाचे या भागातील प्रमाण कमी झाले आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाबरोबरच पूर्व अरबी समुद्र ते पश्चिम मध्य प्रदेश (कोकण व मध्य महाराष्ट्र मार्गे) मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर उत्तर पूर्व राजस्थान व लगतच्या भाग ते मराठवाड्यापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा आता विरून गेला आहे.
तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट
वादळी वारे, पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा अनेक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, विदर्भाच्या काही भागात व कोकण गोव्याच्या तुरळक भागात लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सारासरीच्या जवळपास होते. मंगळवार 18 मे ते गुरूवार 20 मे या कालावधीत आकाश मुख्यत: निरभ्र राहून सायंकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे येथील हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.