औरंगाबाद: औरंगबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडण्या प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. शेतीसाठी वीज हा महत्वाचा घटक असल्याने यात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तत्काळ ऊर्जामंत्री यांच्यासमवेत बैठक घेणार असून शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी पंपांच्या जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरीभाऊ बागडे, उदयसिंह राजपूत, प्रा. रमेश बोरनारे, संजय सिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळेक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात कापूस आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे ह्या अनुषंगाने देखील विभागाने नियोजन करावे. इतर पिकांचे बियाणे तसेच खत शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी नियोजन करावे. मागच्या वर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी पाहता सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या बियाणे कंपन्यानी पुन्हा ही तक्रार येऊ देऊ नये असे सांगत पालकमंत्री म्हणाले की, रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून हा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत मार्ग काढला जाईल किंवा या बाबतीत शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का या बाबतीत देखील प्रयत्न केल्या जातील असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील कृषी बाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षात खरीप हंगामाचे पिकाखालील सरासरी क्षेत्र ६७५१७१ हे. असून कापूस व मका ही दोन प्रमुख पिके आहेत. या दोन पिकांचे सरासरी क्षेत्र अनुक्रमे 3.94 लक्ष हेक्टर व 1.72 लक्ष हेक्टर असून चालू वर्षी खरीप हंगामात तुर, सोयाबीनचे वाढलेले दर लक्षात घेता दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. खरीप हंगाम २०२१-22 मध्ये ६.८१ लक्ष हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून कापूस पिकाखाली ३.९९ लक्ष हे., मका पिकाखाली १.५५ लक्ष हे., तुर पिकाखाली ०.४२ लक्ष हे. व सोयाबीन पिकाखाली ०.२० लक्ष हे. पेरणी अपेक्षित आहे. खरीप हंगामातील अपेक्षित पेरणी क्षेत्रासाठी पिकनिहाय लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडून एकूण 43316 क्विं. पुरवठा निंयोजन करण्यात आले आहे. या नियोजनाप्रमाणे बियाणे पुरवठा होण्यास सुरुवात झालेली असून कापूस 393537 पाकीटे, मका 11095 क्विंटल बियाण्याचा पुरवठा झालेला आहे. सोयाबीन पिकाचे बियाणे वगळता इतर सर्व पिकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सोयाबीन पिकाचे बियाणे उपलब्ध करुन देण्याबाबत महाबीजसह इतर कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. खरीप हंगाम 2021 साठी लागणारी बियाणे, खते यांचे नियोजन करण्यात आले असून पुरवठा नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरु झालेला आहे. खरीप हंगाम 2021 साठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रासाठी केंद्र शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे युरिया 99450 डिएपी 26950, एमोपी 12350, संयुक्त खते 87220 आणि एसएसपी 29840 असे एकूण 255810 मे.टन आवंटन मंजूर केलेले आहे. त्यानुसार माहे एप्रिल, 2021 पासून जिल्ह्यात खतांची आवक सुरू झालेली आहे. दिनांक 17.5.2021 पर्यंत 49825 मे.टन खत पुरवठा झालेला असून मागील शिल्लक साठा 118187 मे.टन सह एकूण 168028 मे.टन खतांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. सोयाबीन बियाण्याच्या उगवणशक्ती बाबत मागील हंगामात आलेल्या तक्रारी लक्षात घेवून कृषी विभागाकडून मागील वर्षभरात घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याबाबत उन्हाळी सोयाबीन बियाणे उत्पादन करण्याबाबत जनजागृती केल्यामुळे ८६०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या स्तरावर उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे बियाणे कंपन्यांकडून पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून याबाबत गुणवत्ता तपासून घेण्याचे अभियान घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.