अत्यंत अभ्यासू, तरलबुद्धीचे, सुसंस्कृत, उच्चशिक्षित, संयमी, उमदे नेतृत्व होते. उद्याचे महाराष्ट्राचे व देशाचे सक्षम नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता. कमी वयात असे कर्तृत्ववान फार कमी नेते आहेत त्यात सातव यांचा समावेश होतो. देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी व राज्यकर्त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रसार माध्यमांनीही भरभरून त्यांच्या कार्याची दखल घेतली. सामान्यातील सामान्य माणसाने हळहळ व्यक्त केली आहे.
२०१२-१३ साली आनंदवन निर्मित स्वरानंदवन संगीत कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी शिवाजी गावंडे यांच्या सहकार्याने आखाडा बाळापूर व कळमनुरी येथे सलग दोन वर्षे आयोजित केले होते. डॉ. विकास आमटे यांच्या सोबत मी, शिल्पेश गंभीरे, सोमनाथ रोडे एक महिनाभर या दौऱ्यात सहभागी असायचो. त्यामुळे खा. राजीव सातव यांची ओळख शिवाजीने करून दिली होती. शिवाजी गावंडे, नांदेड जिल्ह्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे काम पाहत असत. राजीव सातव या दौऱ्यात कलावंताची काळजी घेणे व आनंदवन समजावून घेणे हे बारकाईने करत होते. साधी राहणी, कुठलाही बडेजाव नसलेला कार्यकर्ता. रजनीताई सातव ह्या महाराष्ट्राच्या मंत्री होत्या. आरोग्य व इतर खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यांचे राजीव सुपूत्र.
नम्रता आणि जिज्ञासा काय असते हे मी त्यावेळी अनुभवलेले. नंतर फेसबुकला मित्र झाले. वर्षातून एकदा तरी मेसेज वा संपर्क व्हायचा. गेल्या दहा वर्षात ते देशाच्या पटलावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने, नंतर हिंगोलीचे खासदार, राज्यसभेचे सदस्य म्हणून ते सर्वपरिचित झाले. काँग्रेसने त्यांची क्षमता पाहून पक्षांतर्गत जबाबदाऱ्या दिल्या. त्यांचं पक्षीय, राजकीय, सामाजिक काम इतरांपेक्षा वेगळं होतं हे वेगळे सांगायची गरज नाही. राहुल, प्रियंका व सोनिया गांधी यांच्या परिघात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून जागा मिळवली.
२०१९ साली आमची तिसरी व शेवटची भेट झाली किनवटला. भारत जोडो युवा अकादमी किनवट ही संस्था आरोग्य, शिक्षण व इतर उपक्रम चालवणारी संस्था आहे. तिथे डॉ. अशोक बेलखोडे काम करतात. २०१९ साली त्यांनी राष्ट्रीय युवा शिबिर मे महिन्यात घेतले. गांधी पीस फाउंडेशन दिल्लीच्या राष्ट्रीय युवा योजना अंतर्गत डॉ. एस. एन. सुब्बा राव हे किनवटला ७ दिवस होते. एक दिवसाची भेट देण्यासाठी मानवलोकचे अनिकेत लोहिया व मी किनवटला गेलो. नेमके राजीव सातव यांचे भाषण त्यादिवशी शिबिरात ठेवण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनी आम्ही भेटत होतो. चालताना त्यांनी काय दादा? अस म्हणत मला धक्काच दिला. इतक्या वर्षांनीही त्यांनी नावासह लक्षात ठेवले होते. वागण्यातली इतकी सहजता व आपुलकी मी राजीव कडून अनुभवली होती. आमच्या वयात १६ वर्षांचा फरक. अति बुद्धिमान हा युवक देशाचा पुढे नक्की नेता होणार इतकी खात्री वाटली. दुर्दैवाने कोरोनाची लागण व नंतर इतर साईड इफेक्ट्स यामुळे त्यांचा अंत हा नक्कीच दुर्दवी. अलीकडे राहुल गांधी यांना आनंदवन पाहायला आणायचे हा आग्रह त्यांनी धरला होता. पण त्याआडही कोरोनाच आला. आणि आनंदवन विषयी त्यांची आस्था हीच त्यांच्या स्वभावातील माणुसकीची चुणूक होती. असा हा सामान्यातला अतिसामान्य असलेला पण आचार विचाराने प्रगल्भ असलेला हा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. त्यांचे जाणे हे भावीपिढीचे, महाराष्ट्राचे व देशाचे मोठे नुकसान करणारे ठरेल. त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे धाडस नक्कीच माझ्यात नाही. त्यांचे काम व स्वच्छ प्रतिमा सदैव माझ्या नजरेसमोर असेल.
-दगडू लोमटे, अंबाजोगाई मोबाईल: 9823009512