9028393444 या क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळेल रूग्णवाहिका
औरंगाबाद: औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त व इतर आजाराने त्रस्त गोरगरीब रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता यावे म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादसाठी स्वखर्चाने तीन नवीन रुग्णवाहिकेची मोफत सेवा सुरू केलेली आहे. औरंगाबाद शासकीय रुग्णालयात काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी नर्स, वार्डबॉय, सेक्युरिटी गार्ड यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले होते.
पूर्णपणे मोफत असलेल्या या तिन्ही रुग्णवाहिकेचा औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक रुग्ण लाभ घेत आहे. तिन्ही रुग्णवाहिका हे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील रुग्णांना मोफत सेवा देणार असून विशेष म्हणजे तिन्ही रुग्णवाहिकेत गंभीररित्या आजारी रुग्णासाठी ऑक्सीजनची सुध्दा मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेची सेवा घेतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते.
शहरातून औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील कोणत्याही तालुक्यात अथवा ग्रामीण भागात रुग्णांना घेवून जाण्यासाठी रुग्णवाहिका मदत कक्षात 9028393444 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी केल्यास रुग्णवाहिकेची त्वरित मोफत मदत मिळणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यानी सांगितले.