# मान्सून 21 मे रोजी अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल होणार.

तोक्ते चक्रीवादळ थंडावले

पुणे: मान्सूनचे आगमन 21 मेपर्यत दक्षिण अंदमान आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात होणार असल्याचा अंदाज मंगळवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. दरम्यान, 23 मे रोजी हिंदी महासागर आणि दक्षिणपूर्व बंगालच्या आग्नेय भागावर समांतर हवेच्या वरच्या भागात चक्रावात तयार होणार आहे. यामुळे मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार होणार आहे. याबरोबरच  ‘तोक्ते’  चक्रीवादळ पूर्णपणे थंडावले असून ते 19 व 20 मे रोजी राजस्थान आणि उत्तर प्रदेशाकडे सरकून त्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होईल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तोक्ते ’ या चक्रीवादळाने केरळपासून ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत जोरदार धडक मारली. या चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. या चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण, गोवा, मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीला बसला. त्यामुळे किनारपट्टीवरील भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरातच्या किनारपट्टीवरून हे वादळ सोमवारी जमिनीच्या पृष्ठ भागाकडे सरकल्यानंतर रात्री बारा वाजल्यानंतर हळूहळू त्याचा जोर कमी होऊ लागला. मंगळवारी सकाळपर्यंत हे चक्रीवादळ पूर्णपणे थंडावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *