विद्यार्थ्यांना दहावीत जितके विषय असतात, त्या सर्व विषयावर आधारित एक मल्टिपल चॉईस म्हणजे चार पर्याय असणारी क्वेश्चन बँक तयार करून घ्यावी. एकूण पाच विषय असले तर प्रत्येक विषयाचे वीस असे शंभर (किंवा दोनशे) प्रश्न द्यावेत. भाषा, विज्ञान, गणित, अशा सर्व विषयांवर प्रश्न असावेत. काही प्रश्न कठीण, काही सोपे, काही मध्यम असे सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणारे स्वरूप असावे. ही परीक्षा एक तासाची किंवा जास्तीत जास्त दोन तासांची असू शकेल.. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा विशिष्ट कालावधीत, तीन ते चार आठवड्यात, कधीही कुठूनही देता येईल. एक किंवा दोन तासाकरिता संगणक, स्मार्टफोन सहज उपलब्ध होऊ शकेल…
सध्या दहावीची परीक्षा हा चर्चेचा विषय आहे. सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता कदाचित दुसरा पर्यायही नव्हता. तसं पाहिलं तर सगळं जगच एका अभूतपूर्व परिस्थिती च्या कचाट्यात सापडले आहे. शैक्षणिक क्षेत्र रुळावरून घसरले, त्याला आता वर्ष अधिक झालं. काही परीक्षा कशा तरी झाल्या. कसेतरी अभ्यासक्रम पूर्ण केले गेले. काही परीक्षा पुढे ढकलल्या. शैक्षणिक अभ्यासक्रमात मूल्यमापन हा महत्त्वाचा घटक असतो. दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरी अकरावी च्या प्रवेशाचे काय? डिप्लोमा सारख्या अभ्यासक्रमाना कसे प्रवेश द्यायचे असे बरेच प्रश्न उपस्थित केले जाताहेत. काही उपाय योजना पुढे येताहेत. काही विद्यार्थ्यांना, पालकांना निश्चितच त्यांचे मूल्यमापन हवे आहे. वर्षभर ज्यांनी सिरियसली अभ्यास केला असेल, त्यांची परीक्षा रद्द झाल्याने निश्चितच निराशा झाली असेल. पुढे करियर च्या दृष्टीने ज्या मोजक्या गुणपत्रिका बघितल्या जातात, त्यात दहावी, बारावीचे गुण महत्वाचे असतात. सद्यस्थितीत देखील काहीतरी मार्ग शोधून या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
त्यासाठी एक पर्याय सुचवावासा वाटतो. या विद्यार्थ्यांना दहावीत जितके विषय असतात, त्या सर्व विषयावर आधारित एक मल्टिपल चॉईस म्हणजे चार पर्याय असणारी क्वेश्चन बँक तयार करून घ्यावी. एकूण पाच विषय असले तर प्रत्येक विषयाचे वीस असे शंभर (किंवा दोनशे) प्रश्न द्यावेत. भाषा, विज्ञान, गणित, अशा सर्व विषयांवर प्रश्न असावेत. हे प्रश्न तयार करतांना परीक्षकांच्या कौशल्याची कसोटी असेल. काही प्रश्न कठीण, काही सोपे, काही मध्यम असे सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणारे स्वरूप असावे. ही परीक्षा एक तासाची किंवा जास्तीत जास्त दोन तासांची असू शकेल. पण प्रत्येक पश्न पत्रिकेतील प्रश्नांचा अनुक्रम वेगवेगळा असेल. म्हणजे एकूण शंभर (किंवा दोनशे) प्रश्न प्रत्येक प्रश पत्रिकेत वेगवेगळ्या क्रमाने असतील. असे अनेक प्रश्न संच तयार करता येतील. ज्यांच्या काठिण्य चा दर्जा साधारण सारखा असेल. आजकाल अशा परीक्षा साठी मुलांनी कॉपी करू नये अशी दक्षता घेणारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. लॅपटॉप चा कॅमेरा विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवील. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा विशिष्ट कालावधीत, तीन ते चार आठवड्यात, कधीही कुठूनही देता येईल. एक किंवा दोन तासाकरिता संगणक, स्मार्टफोन सहज उपलब्ध होऊ शकेल. विद्यार्थ्यांना विचार करून फक्त नेमका, योग्य पर्याय टिक करायचा आहे. अशा प्रकारच्या प्रश्न पत्रिका चे मूल्यमापन संगणकच करेल. कारण संगणकावर प्रत्येक पेपरची की(key) देखील उपलब्ध असेल. एकूण शंभर (किंवा दोनशे) पैकी किती गुण मिळाले हे ताबडतोब कळेल. प्रवेशा साठी हा निकाल वापरायचा असल्याने मेरिट लिस्ट तयार करता येईल. प्रत्यक्ष गुणां ऐवजी, म्हणजे अबसोल्युट मार्क ऐवजी पर्सेन्टाईल पद्धतीने रिलॅटिव्ह मेरिट ठरविता येईल. ही पर्सेन्टाईल पद्धत पदव्युत्तर GATE, गेट, परीक्षेसाठी वापरतात.
या पद्धतीने कुठेही विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही. त्यांना घरून, शेजारून किंवा कॉम्प्युटर सेंटर वरून ही परीक्षा त्यांच्या सोयीने देता येईल. हवे तर सध्या लसीकरणा साठी जसा टाइम स्लॉट देतात तसा विद्यार्थ्यांना देता येईल. एकदा लॉग इन केले की तेच गुण ग्राह्य धरले जातील. एकदा प्रश्न संच ओपन झाला की वेळ संपताच विद्यार्थी आपोआप लॉग आऊट होईल. या सर्व प्रक्रियेसाठी स्वतंत्र अँप तयार करता येईल.
- काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा नको असेल तर तसा आग्रह नसावा. परीक्षा ऑप्शनल असेल. आवश्यक नसेल. असे केल्याने काही पालक, विद्यार्थी (तळागाळातील), विरोध करणार नाहीत. ज्यांना आपले मूल्यमापन हवे आहे, ज्यांना स्पर्धेतून चांगल्या कॉलेजला प्रवेश हवा आहे, ज्यांना डिप्लोमा ला जायचे आहे, स्पर्धा परीक्षाना तोंड द्यायचे आहे, तेच विद्यार्थी या परीक्षेत आनंदाने बसतील. आपण किती पाण्यात आहोत, हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपले नेमके स्थान कोणते हे ज्यांना प्रामाणिक पणे जाणून घ्यायचे आहे, ते बहुसंख्य विद्यार्थी, त्यांचे पालक हा ऑनलाइन परीक्षा पर्याय आनंदाने स्वीकारतील. ज्यांना ही परीक्षा नको आहे, स्पर्धा मूल्यमापन नको आहे ते अंतर्गत गुणांच्या आधारे जिथे प्रवेश मिळेल, जागा उरतील तिथे प्रवेश घेतील. त्यांना चॉईस नसेल स्वतःचा.
- इथे खरी परीक्षा असेल ती अशे बहु पर्यायी उत्तरे असलेले प्रश्न संच तयार करणाऱ्या तज्ज्ञांची. एवढ्या मोठ्या देशात, राज्यात असे उत्तम शिक्षक, तज्ज्ञ सहज निवडता येतील. या प्रश्न संचाचे मॉडरेशन करणे, त्यातील पर्याय नीट तपासून शहानिशा करणे, प्रश्नांचे कठीण, सोपे, मध्यम असे स्तर ठरविणे, हे खरे आव्हानात्मक काम असेल. पण त्यात अशक्य असे काहीही नसेल.
- बोर्डाच्या म्हणा, विद्यापीठाच्या म्हणा, तीन तासांच्या अंतिम परीक्षा, त्यातील उत्तर पत्रिकाचे मूल्यमापन, गुणांची उधळपट्टी, निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या कसरती, हे सारे बघता, ज्या पारंपरिक परीक्षा आपण घेत होतो,त्या कितप, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचे मूल्यमापन करीत होत्या, हा गुण ग्राहकता शोधीत होत्या, हा वादाचा संशोधनाचा विषय! त्या तुलनेत वर सुचवलेला नवा सोपा पर्याय ट्राय करायला काहीच हरकत नाही. तीन तासांचा शंभर मार्काचा पेपर, प्रश्नांचे ठराविक वर्गीकरण, साचेबद्ध प्रारूप, असे परीक्षेचे पारंपरिक स्वरूप आता आपण (विद्यार्थी, पालक,शिक्षक), सर्वांनीच विसरले पाहिजे. नव्या परिस्थितीत नवे पर्याय शोधले पाहिजेत. अंगीकारले पाहिजेत. तसेही कोरोना ने आपणा सर्वांसमोर एक आगळीवेगळी, कधीही न पाहिलेली, प्रश्नपत्रिका ठेवली आहेच. या कोरोना प्रश्न पत्रिकेची तर उत्तरे देखील कुणाला माहिती नाहीत. त्या मानाने दहावीची परीक्षा कितीतरी सोपी!!
–डॉ.विजय पांढरीपांडे
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com