# चोवीस तासात 40 किमी रस्त्याच्या कामाचा विक्रम.

बांधकाम विभागाच्या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम करून सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. १४७ फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.  रविवार, ३० मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते आज सोमवार, सकाळी ७ वाजेपर्यंत सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. २४ तासांत सुमारे ४० किलोमीटरचा एका बाजुचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रम आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.

विभागाच्या या कामगिरीबद्दल मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे.

पण आज एक नवीन विक्रम झाला म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही. विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे व त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी विभागाला दिलेले आहेत, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *