मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात येणार
पुणे: उत्तर-पश्चिम (वायव्य) भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प येथे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सर्वसाधारणपणे कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार यंदा देशात मान्सूनमध्ये (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या १०१% पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रशांत महासागरातील स्थिती जैसे थे राहणार असून इंडियन ओशन डायपोल (आयओडी) निगेटिव्ह राहणार असल्याच अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात येणार असल्याचेही हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) प्रवाह दोन दिवसांपासून सक्रिय नसल्याने मान्सून ‘जैसे थे’ आहे. मंगळवार, एक जून रोजी हे वारे काही प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत वाऱ्याचा प्रवाह आणखी वाढल्यास मान्सून गुरुवारपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. मान्सूनच्या वाऱ्यांना पुढे सरकण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. मात्र, ही चक्रिय स्थिती निवळल्याने पुन्हा मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे लवकरच केरळात दाखल होण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला असून केरळ व श्रीलंका मालदीवच्या भागात पुन्हा जोरदार पाऊस पडेल. सध्या तमिळनाडू व परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच उत्तर प्रदेशचा पूर्व भाग ते विदर्भ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.