नवी दिल्ली: देशात सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात आज मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता परीक्षा होणार नसल्यामुळे १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळापत्रकानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.