उर्वरित भागातही ऑरेंज, यलो अलर्ट
पुणे: राज्यात मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या भागात 16 जूनपर्यंत ‘रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात ऑरेंज अलर्ट दिला असून, या भागात मुसळधार पाऊस तर उर्वरित भागात यलो अलर्ट असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील कोकण, मुंबई आणि विदर्भातील काही भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. असाच पाऊस कोकण, मुंबई, विदर्भासह पुण्यातील घाटमाथा, कोल्हापूर, सातारा भागात 16 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. याबरोबरच परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागात यलो अलर्ट असून, या सर्व शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा पार करून पुढील तीन दिवसांत झारखंड, उत्तर छत्तीसगड या भागाकडे सरकणार आहे. मध्यपूर्व अरबी समुद्र पार करून छत्तीसगड विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत द्रोणीय आणि चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याबरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते लक्षव्दीपपर्यंत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे.