पुण्यात जय गणेश व्यासपीठचा ‘चला मुलांनो शिकूया’ उपक्रम
पुणे: रंगबेरंगी फुग्यांनी सजलेले वर्ग… विद्यार्थांच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या… मिकीमाऊसने गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन केलेले स्वागत… अशा वातावरणात १२.१५ वाजता घंटा वाजताच पाटी पेन्सिल घेऊन मुलांनी आनंदाने आपल्या वर्गात प्रवेश केला.
जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या वतीने बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी चला मुलांनो शिकूया…! या उपक्रमांतर्गत सिटी पोस्ट जवळील गुजराती शाळेत २५ मुलांची शाळा भरविण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल. देशमुख, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुरेश पवार, राजेंद्र शिंदे, शिरीष मोहिते, आनंद सराफ, प्रसाद भडसावळे, पृथ्वीराज येळवंडे, दीपक वाईकर, आशिष मोरे, आनंद सागरे, हनुमंत शिंदे, चेतन शिवले, हरिष खन्डेलवाल, नरेंद्र व्यास, वसुधा वडके, सारिका अगज्ञान, सुवर्ण पोटफोडे, किरण सोनिवाल, सागर पवार, संदीप लचके उपस्थित होते.
उपक्रमाची संकल्पना पियुष शाह यांची होती. सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, महाराष्ट्र तरुण मंडळ, श्री काळभैरव तरुण मंडळ, वीर शिवराज मित्र मंडळ व निंबाळकर तालीम या उपक्रमात सहभागी आहेत.
डॉ. अ.ल.देशमुख म्हणाले, कोरोनामुळे शिक्षणाची हेळसांड झाली आहे. ही आपत्ती केव्हा संपेल माहीत नाही. परंतु यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीतील उणीवा आपल्या लक्षात आल्या आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देताना त्यात रंजकता आणली पाहिजे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यामांचा वापर करुन शिक्षण द्यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
महेश सूर्यवंशी म्हणाले, प्रतिकूल परिस्थितील या मुलांना शिक्षण देण्याची बुद्धी गणपती बाप्पाच देऊ शकतात. जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी सुरु केलेला चला मुलांनो शिकूया…! हा उपक्रम अतिशय चांगला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून शक्य ती मदत करु, असेही त्यांनी सांगितले.
पीयुष शाह म्हणाले, मुलांना गुणात्मक शिक्षण मिळावे, या हेतूने शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेच्या माध्यमातून मुलांना व्यावहारिकदृष्टया उपयोग होईल अशा गोष्टी शिकविण्यावर भर असणार आहे. शालेय शिक्षणासोबतच नृत्य, संगीत, नाटक, सिनेमा, कथाकथन असे विविध विषय देखील आम्ही विद्यार्थ्यांसमोर घेऊन येणार आहोत. पियुष शाह ह्यांनी प्रास्तविक केले तर शिरीष मोहिते यांनी आभार मानले.