आपल्याकडे काळाबरोबर फक्त शिक्षणाचाच दर्जा घसरला असे नाही, तर गुरू शिष्याचे नाते देखील पार बदलले आहे. ज्या शालेय शिक्षकामुळे, कॉलेजच्या प्राध्यापकामुळे माझे आयुष्य खऱ्या अर्थाने घडले ते मला आजही आठवतात. माझ्या मुलांजवळ, नातवांजवळ, मित्रांजवळ मी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतो. आदराने बोलतो. आज त्यांच्यापैकी दोघे तिघेच आहेत. पण त्यांच्याशी देखील मी संबंध टिकवून ठेवले आहेत. त्यांच्या कुटुंबाशी देखील! प्राध्यापक या नात्याने हा आदर, ही आपुलकी मी देखील अनुभवली आहे. पण एकूणच आजच्या उमलत्या पिढीच्या शब्दकोशातून श्रद्धा, आदर, निष्ठा, हे शब्द हद्दपार झाले आहेत. ही वस्तुस्थिती आहे.
माझ्या भाषेवरील प्रभुत्वाचे श्रेय शाळेतील इंग्रजी अन् मराठीच्या शिक्षकाकडे जाते. आमचे इंग्रजीचे पंचवटीकर सर फार कडक होते. त्यांनी शिकवताना कधी फळा वापरला नाही. संवादाच्या माध्यमातून ते शिकवायचे. मला अन् आणखी एक दोघांना आळीपाळीने उभे करून धडा किंवा कविता वाचायला सांगायचे. त्यानंतर त्यावर त्यांचे विवेचन, भाष्य सुरू व्हायचे. ते पुनश्च आम्हाला रिपीट करायला लावायचे. हे सर मार्क देण्याच्या बाबतीत अतिशय कंजूष होते. आमच्या सेक्शन ला पन्नास पैकी हायेस्ट गुण म्हणजे सत्तावीस, अठ्ठावीस एवढेच! उलट दुसऱ्या सेक्शन ला दुसरे शिक्षक हायेस्ट गुण बेचाळीस, त्रेचाळीस पर्यंत द्यायचे. उत्तराला एक चतुर्थांश, तीन चतुर्थांश असे गुण देण्यात पंचवटीकर सरांना काय आनंद मिळायचा देव जाणे! पण त्यामुळे बोर्डात मेरिट मध्ये वरचा नंबर मिळूनही माझे इंग्रजी चे प्राविण्य एका मार्काने गेले होते! एरवी सर्व विषयात प्राविण्य मिळाले असते. त्याचे त्यावेळी थोडे दुःख झाले खरे. पण पंचवटीकर सरामुळेच इंग्रजी लेखन, वाचन पक्के झाले हेही तितकेच खरे. मराठी च्या मोहरील सरांनी तर माझ्यावर खास मेहनत घेतली होती. त्यावेळी मॅट्रिकला मी आगळावेगळा प्रयोग केला होता. ज्या लेखकाचा धडा असेल, त्या धड्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिताना त्या धड्याच्या लेखकाची शैली वापरली होती. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे मोहरील सरांनी खूप कौतुक केले. लेखनाची हौस मला लहानपणा पासूनच होती. त्याला या सरांनी खतपाणी दिले. माझ्या हस्त लिखित पुस्तकाला मोहरील सरांची प्रस्तावना होती. मी मोठा (?) लेखक होईल हे त्यांचे भाकीत काही प्रमाणात खरे ठरले.
इंजिनिअरिंग चे माझे खरे शिक्षण आयआयटी ला झाले. एक तर आयआयटी त प्रवेश मिळणे हेच एक दिव्य होते. त्याही पेक्षा मोठे दिव्य तिथे सर्वाईव्ह होणे! पण आमच्या अडचणी तिथल्या बंगाली प्राध्यापकांनी समजून घेतल्या. वैयक्तिक पातळीवर इनव्हाल्व होऊन जाणून घेतल्या. उत्तम शिक्षकांची खरी ओळख आयआयटी तच झाली. अभ्यासक्रम अतिशय कठीण. आमच्या नागपुरी पार्श्वभूमीला न पेलवणारा. पण विभाग प्रमुख प्रा सन्याल, माझे प्रबंधाचे मार्गदर्शक प्रा. बी. दास यांनी अक्षरशः पुत्रवत प्रेम केले. प्रा. दास पुढे, मी लेक्चरर म्हणून जॉईन झाल्यानंतर माझे पीएच. डी. चे मार्गदर्शक झाले. त्यामुळे त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले, अगदी शेवटपर्यंत, ते जाईपर्यंत!
प्रो. सन्याल आमच्या सेंटर चे प्रमुख असल्याने, आयआयटी ला असेपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डिफेन्स प्रोजेक्ट वर काम करता आले. या प्रोजेक्ट चे प्रपोजल लिहिण्या पासून तर, तो कार्यान्वित होईपर्यंत सर्व टप्प्यावर प्रो. सन्याल यांनी आपला उजवा हात म्हणून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना मिळालेला अनुभव माझ्यासाठी पुढील यशाचा भरभक्कम पायाच ठरला. मी व्हीएनआयटी चा पहिला निदेशक झालो तेव्हा प्रा. सन्याल यांनी लिहिलेले हस्तलिखित पत्र म्हणजे माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार होता. आयआयटी त आमचे जेव्हा असोशिएट प्रोफेसर म्हणून प्रमोशन झाले, तेव्हा काही तांत्रिक कारणामुळे आमचे नियुक्ती पत्र कुलसचिव देत नव्हते. तेव्हाच ज्या दिवशी प्रो. सन्याल डेप्युटी डायरेकटर झाले त्याच दिवशी त्यांनी सर्वप्रथम आमचे नियुक्ती पत्र रिलीज केले! आमच्या रडार सेंटर ला पहिला परदेशी संगणक आला, तेव्हा त्याचे उद्घाटन स्वतः न करता, प्रो. सन्याल यांनी मला करायला लावले. प्रो. सन्याल नव्वदी पार केल्यानंतर देखील शेवटच्या श्वासापर्यंत आयआयटी त कार्यरत होते. असे भाग्य क्वचित च कुणाला लाभते. ते शेवटी आजारी असतांना योगायोगाने मी कलकत्ता येथे कामाने गेलो होतो. तेव्हा परतीचे विमान पकडण्यासाठी हाती सात आठ तास असतांना देखील मी पत्नीसह त्यांना भेटायला खरगपूर ला गेलो. नेहमी सुटबुटात राहणारे प्रा. सन्याल आयआयटी च्या दवाखान्यात आयसीयु बेडवर होते. त्यांना अशा स्थितीत बघणे हा अत्यंत वेदनादायी अनुभव होता. ती भेट मी कधीही विसरणार नाही. प्रा सन्याल यांना नर्सने काहीतरी सांगितले. खरे तर त्यांना बोलण्याची परवानगी नव्हती. पण त्यांनी डोळ्यांवर चष्मा चढवला. माझा हात हातात घेतला. अन् माझा सर्व परिचय ते मलाच द्यायला लागले!
“तू विजय मनोहर पांढरीपांडे. ७२ साली तुझे एमटेक पूर्ण झाले. ७४ साली तू पुन्हा लेक्चरर म्हणून जॉईन झालास रडार सेंटर ला. ७८ साली तुझे पीएच. डी. पूर्ण झाले…”
असे एकेक करीत ते मी केलेले संशोधन, डिफेन्स प्रोजेक्ट, यावर भरभरून बोलत राहिले. मला विद्यार्थी समजून गणितावर किचकट प्रश्न विचारत राहिले. मी नेहमी सोपे प्रश्न न सोडवता कठीणच प्रश्न सोडवले पाहिजे असा आग्रह धरीत राहिले! शेवटी पत्नीकडे वळून म्हणाले-
“कसलीही काळजी करू नका. साईबाबा सबका भला करेंगे!” आमची त्या वेळची काळजी त्यांना कशी समजली कोण जाणे?आमचा जरी साईबाबांवर विश्वास असला तरी त्यांच्या तोंडून ते नाव म्हणजे आश्चर्यच होते.
असा स्नेह अनेक प्राध्यापकांनी मला दिला. मला शिकवणारेच प्राध्यापक नव्हे तर, माझे सहकारी प्राध्यापक देखील आमच्याशी आपुलकी च्या जिव्हाळ्याने वागले. आधी बंगाल, नंतर आंध्रप्रदेश (आता तेलंगण), अशा बंगाली, तेलुगु प्राध्यापकांचा अनुभव उत्तमच होता. मला कुणीही आऊट साईडर अशी वागणूक दिली नाही. आपण भूमिपुत्र, आमार माटी, आपला माणूस, बाहेरचे उपरे असे शब्द वापरतो, ऐकतो! त्यावरून संघर्ष होतो. महाराष्ट्राबाहेर चार दशके राहूनही अशी संकुचित मनोवृत्ती सुदैवानं माझ्या, कुटुंबाच्या वाट्याला आली नाही. मला शिष्य या नात्याने गुरू कडून मिळाली ती शाबासकीची थाप, अलोट प्रेम. सहकारी प्राध्यापकांकडून मिळाला तो आपुलकी अन् जिव्हाळ्याचा स्नेह, विद्यार्थ्यांकडून मिळाला तो अमाप आदरभाव! म्हणूनच माझ्या उस्मानिया विद्यापीठाच्या कारकिर्दीत माझे आधारस्तंभ असलेले एक प्राध्यापक रेड्डी हे सध्या अस्वस्थ आहेत असे समजले तेव्हा मी बेचैन होतो. आपल्याच घरचे, जवळचे, रक्ताचे कुणी वडील गंभीर अवस्थेत आहेत, या काळजीने मी अस्वस्थ होतो.
आजकाल मात्र हे गुरू शिष्याचे नाते पूर्वीसारखे राहिलेले नाही. एकमेकांकडून अपेक्षा बदललेल्या आहेत. गुण उधळणारे प्राध्यापक लोकप्रिय होतात. कडक शिस्त राहिली दूर, प्राध्यापकांना तोलून मापून बोलावे लागते. बंदिस्त वर्गात सारेच वातावरण बंदिस्त झाले आहे. मोकळी हवा, मोकळे विचार, नाविन्याचा ध्यास, साधना, परिश्रम, जिद्द, यापैकी काहीही कुणालाही नको आहे. पैशाची देवघेव, भ्रष्टाचार हा विषाणू संसर्ग या क्षेत्रातही कोरोना सारखा पसरला आहे. यावर नियंत्रण ठेवायचे कसे,हे सारे बदलायचे कसे, पूर्वीसारखे गुरू शिष्याचे नाते जोपासायचे कसे, हे आपले आपल्यालाच ठरवायचे आहे.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com