पुणे: यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्य पातळीवरील या वर्षीचा नववा भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ काँग्रेस नेते, साहित्य, संगीत, नाटक व ललितकला यांचे जाणते अभ्यासक, प्रसिद्ध वक्ते उल्हास पवार यांना जाहीर झाला आहे. चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक व ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते गुरुवार, ३० सप्टेंबर रोजी अंबाजोगाई (जि.बीड) येथे प्रदान केला जाणार आहे. ही माहिती अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
अंबाजोगाईच्या राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, लोककला, शेती, सांस्कृतीक, चळवळ, शिक्षण, पत्रकारिता, सहकार क्षेत्रात ज्यांनी आपले योगदान देऊन अंबाजोगाईच्या इतिहासात आपले सुवर्णपान लिहिले असे भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार २०१३ पासून सुरू केला. सुसंस्कृत राजकारणी. साहित्यिक, संगीत गायक व रचनाकार, पत्रकार, नाट्य व चित्रपट अभिनय, सहकार, क्रीडा व कृषी या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीस महाराष्ट्र पातळीवर हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी यशवंतराव गडाख-पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना.धों. महानोर, रामदास फुटाणे, पं नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे व प्राचार्य रा. रं. बोराडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीचा हा नववा पुरस्कार उल्हास पवार यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, यशवंतराव चव्हाण यांची शिल्प प्रतिमा, सन्मानपत्र, रोख २५ हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.
अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात 30 सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता कोविड १९ चे नियमांचे पालन केले जाणार असून कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे यांच्यासह डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. सुधीर वैद्य, सतीश लोमटे, भगवानराव शिंदे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे व राजपाल लोमटे यांनी केले आहे.