औरंगाबादः मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यासाठी अनेक विकास योजनांची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पैठणच्या संतपीठाच्या स्थापनेच्या घोषणेबरोबरच परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील मुक्तिसंग्राम स्तंभावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर बोलताना त्यांनी मराठवाड्यासाठी अनेक विकास योजनांची घोषणा केली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावे, अशी चर्चा होती. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ आपण स्थापन करत आहोत. आज हे संतपीठ होत आहे. ते लवकरच मोठे विद्यापीठ झाले पाहिजे. जगभरातील अभ्यासक येथे अभ्यास करण्यासाठी आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या आरोग्याचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यासाठी आपण परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. काहीजण म्हणतील मुख्यमंत्री आले, इतकी कामे जाहीर केली, पण पुढे काय होणार? पुढे त्याचा शुभारंभ झाल्यावर लोकार्पण होणार. आज ज्या काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, त्याच मी जाहीर करत आहे. इतर मोठे विषयही आपण मार्गी लावत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाड्यातील निजामकालीन १५० शाळांच्या पुनर्विकासाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. निजामशाहीच्या काही खुणा आहेत. निमाजशाहीच्या काळातील शाळा आता पडायला आल्या आहेत. ही काही वैभवशाली परंपरा नाही. म्हणून मराठवाड्यातील सुमारे १५० शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत. मराठवाड्यातील शाळांचे रुप अभिमान वाटला पाहिजे, असे करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या अन्य योजना:
• औरंगाबाद शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये नगरोत्थान अभियानातून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबादसाठीची १ हजार ६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सातारा- देवळाई भागातील भूमीगत मलनिःस्सारण प्रकल्पासाठी ३८२ कोटी रुपये देण्याची घोषणा. औरंगाबादेतील सफारी पार्क जगातील एक वैशिष्ट्ये पूर्ण पार्क असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
• औरंगाबाद-शिर्डी या ११२.४० किलोमीटर रस्त्याची श्रेणीवाढ करण्याची घोषणा. औरंगाबाद- अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना आणि औरंगाबाद- शिर्डी हवाई सेवेची चाचणी घेण्याची घोषणाही त्यांनी केली. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकासासाठी वाढीव २८ कोटी रुपयांच्या तरतुदींची घोषणाही त्यांनी केली.
• हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी रुपयांचा निधी देणार. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ४.५० कोटी रुपयांचा निधी देणार. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी ८६.१९ कोटींच्या तरतुदीची घोषणा.
• समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना या १९४.४८ किलोमीटर लांबीच्या महामार्गाला चालना देणार. नरसी नामदेव परिसराच्या विकासाठी ६६.५४ कोटींची घोषणा. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार. उस्मानाबादच्या भूमीगत गटार योजनेसाठी १६८.६१ कोटींची घोषणा.
• परभणीसाठी जलजीवन मिशन अभियानातून अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेसाठी १०५ कोटी रुपये. परभणी शहरातील भूमीगत गटार योजनेच्या कामासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद.