# अखेर २६ दिवसांनंतर आर्यन खानची सुटका.

मुंबईः क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने अटक केलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर आज २६ दिवसांनंतर सुटका करण्यात आली आहे. तुरूंगातून सुटका होताच आर्यन खान त्याच्या मन्नत या निवासस्थानाकडे रवाना झाला आहे.

न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतरही जामिनाची कागदपत्रे कारागृह प्रशासनापर्यंत वेळेत पोहोचू न शकल्यामुळे आर्यन खानला जास्तीची एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगात काढावी लागली. मात्र आज शनिवारी तो तुरूंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड तुरूंगातील बेल बॉक्स आज पहाटे साडेपाच वाजताच उघडण्यात आला होता. आर्यन खानला नेण्यासाठी अभिनेता शाहरूख खान स्वतः तुरूंगाबाहेर उपस्थित होता. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आर्यन खान तुरूंगातून बाहेर आला.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. एनसीबीच्या या कारवाईने बॉलीवूडही हादरले होते. गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. पंरतु कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे शुक्रवारची रात्र आर्यन खानला तुरूंगातच काढावी लागली होती. जामिनाची प्रत कालच आर्थर रोड तुरूंगाच्या बेल बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा बेल बॉक्स उघडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आणि ११ वाजेच्या सुमारास आर्यन खान तुरूंगाबाहेर आला.

आर्यन खान तुरूंगाबाहेर येताच त्याच्या अंगरक्षकांनी त्याच्या भोवती गराडा घातला. त्यानंतर अंगरक्षकांसोबत आर्यन खान मन्नत बंगल्याकडे रवाना झाला. आर्यनच्या सुटकेमुळे मन्नत बंगल्यावर जल्लोषाचे वातावरण आहे. शाहरूखच्या अनेक चाहत्यांनी मन्नतबाहेर गर्दी केली आहे. विशेष म्हणजे मन्नतला रोषनाईही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *