# पोलिसाच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या.

पुणे: दौंड तालुकयातील देलवडी येथे पालघर येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाली बापूराव कदम (वय 26 वर्ष सध्या रा. लोकरी माणिकपूर वसई मुंबई ) असे कर्मचाऱ्याचे नाव असून गळफास घेण्यापूर्वी तिने आपला भाऊ रोहित याला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाल्मीक गजानन अहिरे (रा. पालघर मुंबई) यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दोन वर्षापूर्वी दीपाली कदम यांची पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या वाल्मीक अहिरे यांच्याशी ओळख झाली. अहिरे हा वारंवार दीपालीस ओळखीचा गैरफायदा घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होता. दीपालीचे नुकतेच लग्न ठरले होते. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी दीपाली चा साखरपुडा झाला होता. येत्या 16 नोव्हेंबर रोजी दीपाली व मयूर कांबळे यांचा शुभविवाह ठरला होता. साखरपुडा  व लग्नामुळे दीपाली सध्या तिच्या मूळ गाव देलवडी ता. दौंड येथे होती. सदर लग्न जमल्याची माहिती अहिरे यांना समजताच त्यांनी मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे (राहणार भोसरी पुणे) यांना फोन करून दीपाली संदर्भात माहिती दिली. त्यानंतर सदर बाब मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे यांनी दीपालीचे वडील बापूराव कदम यांच्या कानावर घातली. वाल्मीक आहिरे याने मंगळवार दिनांक दोन रोजी रात्रीच्या सुमारास दीपाली चा भाऊ रोहित यास फोन करून तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करू नका नाहीतर तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली.
मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीयांनी दीपाली हिस समजावून सांगितले. बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन दीपालीने आत्महत्या केली. यासंदर्भात दीपालीचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहेत. दरम्यान, बुधवारी दीपालीवर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *