# शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन.

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, ‘आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.’

बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे होते. २९ जुलै रोजीच त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा झाला होता. राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले होते. जाणता राजा या महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केले होते. २७ वर्षांत जाणता राजा या महानाट्याचे १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. या महानाट्याचा पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या महानाट्यात १५० कलावंत काम करतात. रंगमंचावर हत्ती-घोडे यांचाही वावर असतो.

पुण्याच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला होता. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर १२ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ले, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास केला होता.

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. त्यावेळी यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली होती. २०११ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

शिवाजी महाराजांसंबंधी आस्था निर्माण करण्यात मोठे योगदान -शरद पवार

पुरंदरे यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुरंदरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवचरित्राबद्दल शेकडो व्याख्याने दिली. शिवाजी महाराजांसंबंधी आस्था निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. बाबासाहेब पुरंदरे सतत लोकांशी सुसंवाद ठेवत. ते आज आपल्यात नाहीत. त्याबद्दलची अस्वस्थता आणि दुःख अनेकांच्या मनात आहे, असे पवार म्हणाले. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास राज्याच्या समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्देही होते. पण त्यावर भाष्य करण्याएवढा मी जाणकार किंवा इतिहासतज्ज्ञ नाही. हे सगळे असले तरी त्यांचे काम मोठे होते, असेही पवार म्हणाले.

इतिहास आणि सांस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी -नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे. शब्दांमध्ये मांडता येणार नाही असे दुःख मला झाले आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनामुळे इतिहास आणि सांस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेले इतर कामही कायमच स्मरणात राहील, असे मोदींनी म्हटले आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार:

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार गिरीष बापट, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *