औरंगाबाद: कोरोनाचे युद्ध नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून कोरोनाचे युद्ध जिंकणारच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला विश्वास आपण सर्व मिळवून सार्थ ठरवू, असा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुंबई येथून पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. यावेळी फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलिल, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सतीश चव्हाण, संजय शिरसाट, अंबादास दानवे, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. किरवले यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी सुरूवातीला कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच सारीच्या आजाराबाबत अधिष्ठाता डॉ. येळीकर यांच्याशी चर्चा केली. यामध्ये सारीचा आजार नियंत्रणात असल्याचे डॉ. येळीकर म्हणाल्या. व्हेंटीलेटर उपलब्धता, रास्त दुकानदारांच्या तक्रारी व केलेली कारवाई, शिवभोजन थाळीची तत्काळ पूर्तता करणे, पवित्र सण रमजानच्या अनुषंगाने पोलिस विभागाने घ्यावयाची खबरदारी व कार्यवाही, कोरोनाच्या मृत रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी करावयाची कार्यवाही आदींबाबत श्री. देसाई यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेत सूचना केल्या. लोकप्रतिनिधींच्या मौलिक सूचनांची नोंद घेतल्याचे सांगत, शासन स्तरावरून या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे श्री. देसाई म्हणाले.
जिल्ह्यातील गरजवंतांना अन्नधान्य, अन्नांची पाकिटे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप लोकप्रतिनिधींनी केले व जनतेला दिलासा दिला त्या सर्व लोक प्रतिनिधीचे आभारही मानतो, असेही श्री. देसाई म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून नवीन आर्थिक वर्षात किमान पाच टक्के इतका निधी आरोग्यविषयक बाबींसाठी राखून ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्याशिवाय अतिरिक्त निधीची मागणी असल्यास देखील उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री. देसाई म्हणाले.
स्वस्त धान्य दुकानांच्या बाबतीत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कारवाया केलेल्या आहेत. परंतु अजूनही अशा तक्रारी प्राप्त होत असतील, तर भरारी पथके स्थापन करून, स्वस्त धान्य दुकानांच्या तपासणी करण्यात याव्यात. जबाबदार स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात यावी. शक्य झाल्यास त्यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात यावी.
शहरातील भावसिंगपुरा येथे एका महिलेच्या अंत्यविधीसाठी अधिक लोकांचा समुदाय असल्याचे समजले. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष रहावे. नागरिकांनीही अंत्यविधीची माहिती पोलिस प्रशासनास द्यावी व पोलिस प्रशासनाकडून अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरवावा, आवश्यकतेपेक्षा जास्त लोक जमणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. सर्व शासकीय कामे जी लॉकडाऊनमधून वगळली आहेत, ती तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.
सुरूवातीला जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत केलेली कार्यवाही. रुग्ण संख्या, उपलब्ध निधी, आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, उद्योग, रमजानच्या पार्श्वभूमीवर करावयाची कार्यवाही याबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांना माहिती दिली. तसेच औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत तपासणी व संशोधनाच्या अनुषंगाने एक कोटी रुपयांचा विशेष निधी ऑरिक प्रकल्पांतर्गत CSR मधून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे सदर अद्ययावत केंद्र कोरोना उपचारावर तपासणी नव्हे तर संशोधन करणारे देखील महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, अशी माहितीही श्री. चौधरी यांनी दिली.
पोलिस आयुक्त श्री. प्रसाद, अधिष्ठाता श्रीमती डॉ. येळीकर, पालिका आयुक्त श्री. पांडेय, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. किरवले यांनीही पालकमंत्री श्री. देसाई यांना त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.