पद्मश्री डॉ. वामन केंद्रे, डॉ रणधीर शिंदे, पंजाबराव डख, अनुपमा उजगरे यांची उपस्थिती
अंबाजोगाईः यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ३७ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बालआनंद मेळावा, शास्त्रीय संगीत कार्यक्रमात ‘सतार-संतूर जुगलबंदी’ शास्त्रीय गायन, पुरस्कार वितरण, समारोप समारंभ संपन्न होणार आहे.
अंबाजोगाईत गेल्या ३६ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपूर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ३७ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर २०२१ गुरुवार, शुक्रवार व शनिवार असा संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
गुरुवार, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ .३० वा. या समारोहाचे उद्घाटन कोल्हापूर येथील लेखक, साहित्य समीक्षक व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी ठाणे येथील येथील ज्येष्ठ कवियत्री अनुपमा उजगरे या राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अमरावती येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. पवन नालट करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी आनंद पेंढारकर – डोंबविली, कल्पना दुधाळ- दौंड, शेख आबेद – महागाव, शरद धनगर – जळगाव, संतोष नारायांकर – परभणी व सुहासिनी देशमुख – नांदेड यांचा सहभाग राहणार आहे.
शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून सुप्रसिद्ध बालसहित्यकार एकनाथ आव्हाड मुंबई हे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील. या वर्षी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शालेय चित्रकला स्पर्धा त्या त्या शाळेत घेतल्या जात आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. सायं. ७.३० वा. सुगम संगीताचे आयोजन केले आहे. अहमदनगर येथील सुप्रसिद्ध युवा गायिका झी टिव्ही सारेगमप लिटिल चॅम्प विजेती व इंडियन आयडॉल फेम अंजली गायकवाड व झी युवा संगीत सम्राट विजेती आणि क्लासिकल व्हाईस ऑफ इंडिया विजेती नंदिनी गायकवाड या ‘अंतरंगीचे नादविश्व’ हा भावगीत, भक्तिगीत, गझल, नाट्यगीत, भजन सादर करतील. त्यांना अंगद गायकवाड हे संवादिनीवर साथसंगत करतील व सहगायन ही करतील. त्यांना तबल्याची साथ प्रशांत थोरात, सिंथेसायझर वर अजित गवारे, ॲक्टोपॅडवर गौतम गुजर तर प्रा. प्रसाद बेडेकर निवेदन करतील.
२७ नोव्हेबर, शनिवार रोजी सकाळी १०.३० वा.शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून प्रयोगशील शेतकरी,अलीकडे तंतोतंत हवामान अंदाज व्यक्त करणारे प्रसिद्ध व्यक्तित्व पंजाबराव डख यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी परिषद होणार असून ते “बदलते हवामान व शेती” या विषयावर मार्गदर्शन करतील तर अंबाजोगाई कृषी महाविद्यालय येथील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे “मराठवाड्याची शेती – सद्यस्थिती व भविष्यातील दिशा” या विषयावर मार्गदर्शन करतील.
समारोप समारंभ व पुरस्कार वितरण:
शनिवारी समारोप समारंभ होत असून सुप्रसिद्ध रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक व नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा नवी दिल्लीचे माजी संचालक पद्मश्री डॉ.वामन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे. या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (युवा व्याख्याता) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून त्यात सेलू येथील प्रयोगशील शेतकरी, शेतकर्यांचे प्रेरणास्थान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना कृषी, नांदेड येथील ज्येष्ठ लेखक प्रा.जगदीश कदम यांना साहित्य, औरंगाबादचे पं.गिरीश गोसावी यांना संगीत तर अनाथ वन्यजीव रक्षक व निसर्ग संवर्धक युवकांचे प्रेरणा असणारा शिरूर कासार येथील युवक सिद्धार्थ सोनवणे याला युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.
‘सतार संतूर जुगलबंदी’ व शास्त्रीय गायन:
रात्री ८.३० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत उज्जैन येथील प्रतिभावान कलावंत संस्कृती वाहने सतार व प्रकृती वाहने संतूर यांची जुगलबंदी होईल. त्यांना पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक पांडुरंग पवार हे साथ करतील. यानंतर पं.गिरीश गोस्वावी औरंगाबाद यांचे गायन होईल. त्यांना संवादिनीवर गजानन केचे हे तर व्यंकटेश पंडित तबला साथ करतील. या वर्षी हा समारोह कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून श्रोत्यांच्या उपस्थित होईल.
कला दालन व ग्रंथ प्रदर्शन:
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ग्रंथ प्रदर्शन व विक्री, चित्र व फोटो प्रदर्शन आयोजित केले आहे. अंबाजोगाई येथील तरुण कलावंत, चित्रकार व शिल्पकार नेताजी यादव यांच्या चित्रांचे व शिल्पांचे प्रदर्शन ‘वात्सल्य’ हे तिन्ही दिवस रसिक व प्रेक्षकांना पाहता येतील.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा.सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे,सदस्य,प्राचार्य प्रकाश प्रयाग,प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा.भगवान शिंदे, प्रा.सागर मुंडे यांनी व इतर पदाधिकारी तसेच सल्लागार भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.