सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही तिथे केंद्र सरकार ईडी, सीबीआय अशा विविध केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे काम करत आहे. केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असून, त्याद्वारे स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम सुरू आहे. पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू द्या, अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही. असे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केले आहे.
महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले. पुढे ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. तसेच पुढील निवडणुकीत सर्व जर एकत्र लढले, तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल. असे स्पष्ट इशारा पवारांनी भाजपला दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे नेहमी राज्यातील तीन पक्षाचे असलेल्या महाविकास आघाडीवर नेहमी टीका करत असतात. त्यावर देखील पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, चंद्रकात पाटील म्हणतात की, हे सरकार दोन दिवसात पडेल. नंतर ते दोन महिन्यात पडेल, तर नंतर हे सरकार एक वर्षात पडेल अशी भविष्यवाणी चंद्रकात पाटील नेहमी वर्तवत असतात, असे सांगतानाच ते जर ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल. असा टोला देखील पवारांनी चंद्रकात पाटलांना लगावला आहे.