# कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍यांना होणार दंड.

मुंबई: राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक,  मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी  करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की,  खेळाडू, अभिनेते   इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे, कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले  ‘कोविन प्रमाणपत्र देखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकोय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

नियमांचे पालन न करणा-या व्यक्तीस पाचशे व संस्था, आस्थापनांना दहा हजार दंड:

कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या  दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,

तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *