# देशात ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

पुणे: सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलंल आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाकडून अधिकच खबरदारी घेण्यास सुरूवात झालेली आहे. मात्र असे जरी असले तरी देखील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आपल्या देशामध्येच आज ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही. त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ‘ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक आहे, असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही. कारण, तसं काही सिद्धही झालेलं नाही, असंही राजेश टोपे म्हणाले.

पुण्यात माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितलं की, आज मी महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून खात्रीपूर्वक सांगेन, की आपल्या देशामध्येच आज ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही. त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ‘ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक आहे, असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही. कारण, तसं काही सिद्धही झालेलं नाही. त्यामुळे आज एकदम चिंताग्रस्त होण्याचं काही कारण नाही. हे मी अतिशय अभ्यास करून, माहिती घेऊन खात्रीपूर्वक महाराष्ट्रातील जनतेला सांगेन. कुठल्याही परिस्थितीत आज जे अनलॉक केलेले विषय आहेत, त्यात कुठेही बदल करण्याचा आज विचार नाही. शाळा १ डिसेंबर रोजीच सुरू होणार. माझी आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची याबाबत सखोल चर्चा झाली. त्यामुळे त्यामध्येही काही बदल होण्याचं कारण नाही. आज काय करावं तर कोविड नियमांचे पालन करावे, एवढच जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. त्यानंतरच्या काही सूचना असतील तर जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर हे आपल्याला कळवतील. त्या पद्धतीने राज्य सरकार पुढील काळात काम करेल.

तसेच, ‘ओमायक्रॉन’ संदर्भात दोन बैठका झाल्या, एक टास्क फोर्स बरोबर आणि संपूर्ण राज्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री, आरोग्य विभागाची झाली. कॅबिनेटमध्ये देखील याबाबत सविस्तर चर्चेचा विषय होता. मुख्यमंत्र्यांची अशी स्पष्ट सूचना होती की, कुठल्याही परिस्थितीत ज्या १२ देशांमध्ये आता हे आढळलेलं आहे. त्या १२ ‘Countries of Risk’ असं आपण त्यांना म्हणू, त्या देशांमधून येणाऱ्या विमानांवर आपल्या महाराष्ट्रात निश्चितपणे बंदी घातली पाहिजे. त्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाल आपण पत्र लिहू. ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तरी आपल्याला राज्याच्या काळजीच्या दृष्टीने त्यावर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. असं देखील यावेळी आरोग्यमंत्री टोपेंनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, ज्यावेळी ‘ओमायक्रॉन’ संदर्भात माहिती आम्हाला मिळाली त्याचवेळी आम्ही विमानतळं विशेषता विमानतळ प्राधिकरण की ज्यांना मागील महिनाभरात १५ दिवसांत किती लोक आपल्या राज्यात आलेले आहेत, त्याबाबत अधिक माहिती व यादी मागवण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. जेणेकरून त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येईल. अशी देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी माहिती दिली.शिवाय, भारत सरकारने आजच अ‍ॅडव्हायझरी जारी केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की, ‘Countries of Risk’ या देशांमधून येणाऱ्या संपूर्ण प्रवाशांना आल्यानंतर, एकतर बोर्ड होण्याच्या अगोदर ४८ तास आरटीपीसीआर निगेटिव्ह असलं पाहिजे. आल्यानंतर देखील त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. त्यानंतर जर ते पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे लक्षणात्मक उपचार केले जातील. निगेटिव्ह असलं तरी देखील त्या व्यक्तीस गृहविलगिकरणाच्या सक्त सूचना असतील. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि आठ दिवसानंतर पुन्हा आरटीपीसीआर करून, याबाबतची खात्री केली जाईल की ते कसे आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांचे स्वॅब जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी देखील पाठवले जातील. जेणेकरून कोणत्या प्रकारचा व्हेरिएंट आहे, हे देखील त्यातून निश्चित झालं पाहिजे. या सर्व बाबी देखील यामध्ये ठरवण्यात आलेल्या आहेत. असंही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *