मुंबई: मराठी भाषा विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पुस्तकांचे गाव’ या प्रकल्पाचा लवकरच राज्यभर विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.
याच अनुषंगाने आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, श्रीरामपूर येथील शब्दांलय प्रकाशनच्या प्रकाशिका सुमती लांडे उपस्थित होत्या.
मराठी भाषा विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील भिलार येथे ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. हाच प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा मानस श्री. देसाई यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात सहा विभागीय स्तरांवर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांना केल्या. याद्वारे वाचकांना सर्वप्रकारचे ग्रंथ, कथा, कांदबरी, बालसाहित्य, नाटके आदी साहित्य या उपक्रमांद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.