पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उमेदवाराचे तिकीट कापण्याच्या मुद्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. तिकीट पक्षाचे असते. त्यामुळे माझे तिकीट कापले हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. तिकीट पक्षाचे असते. व्होटबँक पक्षाची असते. तुमचे कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होटबँक संत महतांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी या सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होटबँक तुम्हाला मिळते. त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडेसे उपयोगी पडते. अन्यथा ते तिकीट, उमेदवार आणि व्होटबँकही पक्षाची आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
बालीशपणाचे वक्तव्य- मिटकरीः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू समाजापुरते मर्यादित ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही महाराज हिंदूंची व्होटबँक वाटतात. त्यामुळे भाजपलाही वाटणे स्वाभाविक आहे. महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे हिंदूचे राज्य नव्हते, हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. त्यात मुस्लीमसुद्धा होते, चंद्रकांत पाटलांना एवढी तरी माहिती असायला हवी. पण आता राजकारणासाठी महाराजांचा सोयीनुसार वापर केला जात आहे, असे मिटकरी म्हणाले.
हे बालीशपणाचे वक्तव्य आहे. उतारवयात बुद्धी नाठी होते असे म्हणतात. हे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी दुखावले आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. चंद्रकांत पाटील यांनी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, असे मिटकरी म्हणाले.