# पुन्हा रंगणार शंकरपटांचा थरार, सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील शंकरपटांवरील बंदी उठवत असल्याचा महत्वाचा निकाल गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा शंकरपटांचा थरार अनुभवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यती म्हणजेच शंकरपट स्पर्धेबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी पार पडली. पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक करण्याच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटांवरील बंदी उठवली आहे.

महाराष्ट्र सरकारने २०१७ मध्ये शंकरपट म्हणजेच बैलगाडी शर्यतीला परवानगी देणारा कायदा संमत केला होता. त्या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शंकरपटांना स्थिगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकार आणि पेटाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या खेळावर बंदी आणल्यामुळे शेतकरी नाराज होते. गेली काही वर्षे आम्ही सर्वजण बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत होते. आजच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर दिली. शेतकऱ्यांनी अटी-शर्थींचे पालन करून शर्यती भरवाव्यात आणि आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बैलगाडा शर्यातींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा -अजित पवार

“राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *