# पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक धोरण -सुभाष देसाई

महिंद्राच्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. त्यानुसार राज्यात 2030 पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि ग्राहकांना अनुदान देण्याची नव्या धोरणात तरतूद आहे. या धोरणास विविध ऑटोमोबाईल कंपन्यांकडून प्रतिसाद लाभत आहे. मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा चालविल्या जातात. येत्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक रिक्षा धावतील. यासाठी रिक्षा संघटना पुढाकार घेईल. कंपनीने देखील यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली आहे.  या रिक्षाची किंमत दोन लाख रुपये इतकी असेल. प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार आहे. इंधनापोटी लागणारा खर्च वाचत असल्याने रिक्षा मालकाला पाच वर्षात दोन लाख रुपयांपर्यंतची बचत याद्वारे होणार आहे.

यावेळी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेड  या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते. ट्रिओ रिक्षाचे अनावरण झाल्यानंतर स्वत: उद्योगमंत्र्यांनी रिक्षा चालवली आणि वाहना विषयी माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *