# दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर.

१०वीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर १२वीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत

मुंबई: राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी
१०वी  आणि १२वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आले आहे. १०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर १२वीची लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत ऑफलाईन म्हणजेच पूर्वी प्रमाणेच घेण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५% कपात करण्यात आली असून, उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) दहावी, बारावी साठी अनुक्रमे २५ फेब्रुवारी ते १४ मार्च व १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल. दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षेबाबतही वेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, १२ वीचा निकाल जून च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर १०वीचा निकाल जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *