# औरंगाबादच्या महिलेस ओमायक्रॉनची बाधा; मुंबईत उपचार सुरू.

मुंबई: कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेले सहा नवीन रूग्ण महाराष्ट्रात रविवारी आढळून आले. त्यापैकी एक महिला रूग्ण औरंगाबादची रहिवासी असून ती ब्रिटनमधून प्रवास करून आलेली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चाचणीत ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली असून त्यांच्यावर मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सहा नवीन ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी चार रूग्ण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चाचण्यात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एक रूग्ण औरंगाबादचा रहिवासी असून तो ब्रिटनमधून प्रवास करून आलेला आहे. उर्वरित तीन रूग्णांपैकी दोन रूग्ण कर्नाटकचे तर एक रूग्ण मुंबईचा आहे. कर्नाटकचे रहिवासी असलेले दोन्ही रूग्ण टांझानियामधून प्रवास करून आलेले आहेत.

ओमायक्रॉनची बाधा झालेला औरंगाबादचा रहिवासी रूग्ण २१ वर्षीय महिला असून ही महिला इंग्लंडमधून प्रवास करून आलेली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ही महिला औरंगाबादेत येणार होती. परंतु विमानतळावरील सर्वेक्षणातच ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या महिला रूग्णावर मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  विशेष म्हणजे या महिला रूग्णामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

औरंगाबादेतील रहिवासी असलेला हा महिला रूग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या महिला रूग्णावर मुंबईतच उपचार सुरू असल्यामुळे औरंगाबादकरांना सध्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. परंतु कोविड अनुरूप वर्तन करत आपले व्यवहार सुरळित ठेवणे आणि प्राधान्याने लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२ रूग्ण मुंबईत, ११ रूग्ण पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे ग्रामीणमध्ये ७, पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३, साताऱ्यात ३, कल्याण डोंबिवलीमध्ये २, उस्मानाबादेत २ तर बुलढाणा, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रूग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यापैकी २८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *