अंबाजोगाई: बौद्ध साहित्य परिषदेचे पदाधिकारी व परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मारूती बनसोडे यांच्यासह संयोजन समितीचे कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाजोगाई येथे संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत नळदुर्ग येथे होणा-या सातव्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ‘उपरा’ कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संमेलनाचे रितसर निमंत्रण त्यांनी स्वीकारले असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सातवे बौद्ध साहित्य संमेलन हे नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) येथे १६ जानेवारी २०२२ रोजी होणार असल्याचे बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व संयोजक मारूती बनसोडे यांनी संयुक्तरित्या जाहीर केले.
सातव्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांचा अल्पपरिचय पुढील प्रमाणे आहे.उपरा,उध्वस्त,क्रांतीपथ,पालावरचं जग,प्रकाशपुत्र,बंद दरवाजा,भटक्यांचं भारूड आदी सुप्रसिद्ध पुस्तकांचे ते लेखक आहेत.तसेच महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमातींचे ते अभ्यासक आहेत.महाराष्ट्रातील विविध चार संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले आहे.२००८ साली भारत सरकारने त्यांना “पद्मश्री” हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.माने यांना यापूर्वी जवळपास विविध अकरा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहेत.फुले-शाहू-आंबेडकर यांच्या चळवळीचे ते सक्रिय अभ्यासक आहेत.लक्ष्मण माने यांनी त्यांच्या ४२ पोटजातींच्या एक लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांसह २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या प्रवर्तनवादी चळवळीतील सामाजिक कार्याची आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन नळदुर्ग येथे होणा-या सातव्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली आहे.