मुंबई: देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले असले तरी कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस भर पडत आहे. आज काही अटींवर अन्य दुकानांनाही परवानगी दिली असून यामधून शहरी भाग वगळण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे या अतिमहत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. यामुळे याठिकाणचा लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई आणि पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे राज्य सरकार येथील लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई आणि पुण्यातील तसेच आसपासच्या शहरांमधील रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई-पुण्यातील एमएमआर परिसरातील लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही. या शहरामध्ये वाढत असलेल्या रुग्णांमुळे तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्याची गरज आहे. लोकल ट्रेन, बस, दुकाने आणि अस्थापनांवरील बंदी जून संपेपर्यंत राहणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढणारी संख्या महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अर्थचक्र सुरु करण्यामध्ये अडथळा निर्माण ठरत आहे. राज्याचे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे उत्त्पन्नाची दोन प्रमुख स्त्रोत आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजारावर गेला असून यामध्ये सरासरी दररोज 200 रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी पुणे परिसरात 104 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यात दर आठवड्यातून दोन दिवस दूध, भाजीपाला देण्यात आहे. केंद्रीय समितीने तर पुण्यामध्ये मे संपेपर्यंत मोठ्या प्रमाणावर क्वारंटाईनची सुविधा उभरण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई, पुणे या शहरांच्या पाठोपाठ नागपूरमध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईत 983 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. यापैकी निम्म्याहून जास्त झोन हे झोपडपट्टीमध्ये आहेत. राज्यातील अन्य भागात देखील कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. नाशिक मालेगावमध्ये आतापर्यंत 100 रुग्ण पाडले असून नागपूरमध्ये देखील कोरनाबाधितांचा आकडा 100 च्या वर गेला आहे.