मुंबई: औषध निर्माण क्षेत्रातील उद्योजक सतीश वाघ यांच्या सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड कंपनीने आज मुंबई शेअर बाजारात (बीएसई) नोंदणी करून वेगळा आदर्श निर्माण केला. सुप्रिया लाईफसायन्सला रु.700 कोटी गुंतवणूकीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात मात्र गुंतवणूकदारांनी 7 पट जास्त प्रतिसाद दिला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता सुप्रिया लाइफसायन्सच्या व्यवहारास सुरुवात करण्यात आली. यावेळी बीएसईचे संचालक आशिष कुमार चौहाण, कंपनीचे अध्यक्ष सतीश वाघ, विविध बँकांचे प्रतिनिधी, गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड कंपनीने भांडवली बाजारात नोंद करुन उद्योजकांपुढे आदर्श ठेवला आहेत. एखादे स्वप्न पाहणे आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम सतीश वाघ या मराठी उद्योजकांने केले, असे गौरवोद्गार श्री. देसाई यांनी काढले.
मुंबई शेअर बाजारात अनेक लघु, सूक्ष्म व मध्यम स्वरुपातील उद्योग नोंदणी करत असून याद्वारे आपल्या उद्योगांचा विस्तार करत आहेत. इतर उद्योगांनी देखील भांडवल उभे करण्यासाठी भांडवली बाजारात नोंदणी करण्याची गरज आहे, असे श्री. देसाई म्हणाले.
यावेळी सुमीत बागरी, विवेक तोष्णीवाला, स्मिता वाघ, डॉ. सलोनी वाघ, शिवानी वाध, कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.